आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी वेबसाइटसाठी सरकारी कर्मचारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची इत्यंभूत माहिती जगाला व्हावी म्हणून एका खासगी संस्थेने वेबसाइट तयार केली आहे. मात्र, त्या खासगी वेबसाइटवर माहिती भरण्यास ग्रामसेवकांना सांगण्यात येणार आहे. तसे लेखी आदेश काढणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितले.

वेबसाइटचे उद्घाटन सोमवारी आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाले. मोडनिंब येथील केएलएस सोल्यूशन या संस्थेने वेबसाइट तयार केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व 1028 ग्रामपंचायतींची सविस्तर माहिती भरण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या वेबसाइटमध्ये माढा तालुक्यातील सहा गावांची सविस्तर माहिती भरली आहे. उर्वरित गावांची माहिती भरण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे लेखी आदेश काढण्यात येणार आहे.

‘सोलापूर ग्रामपंचायत डॉटकॉम’ या वेबसाइटमध्ये ग्रामपंचायत सदस्यांची संख्या, त्या गावातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंब, शालेय पोषण आहार, ग्रामशिक्षण समिती सदस्यांची नावं व संपर्क क्रमांक, गावामध्ये राबवत असलेल्या विकासकामांची अद्ययावत माहिती व छायाचित्र असेल. त्यासाठी ग्रामसेवकांना स्वतंत्र कोड क्रमांक व पासवर्ड देण्यात आलेत. त्यावर गावकर्‍यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करण्यात येतील, असे केएलएस सोल्यूशन्सचे कैलास गोरे यांनी सांगितले.