आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांचे पगार नाहीत, नवे अधिकारी कसे मागता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुम्हाला कर्मचार्‍यांचे पगार देता येत नाहीत, मग रिक्त पदांवर अधिकारी कसे मागता?, अशा शब्दांत पालकमंत्री दिलीप सोपल यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूर महापालिका आयुक्तांची कानउघाडणी केली. उपलब्ध कर्मचार्‍यांकडून कामे करून घ्या, असेही त्यांनी सुनावले.

पालकमंत्री सोपल यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. पालकमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी आढावा सादर करून समस्या मांडल्या. ‘‘तुम्ही नुसत्या मागण्या करता. पण, त्यासाठी पाठपुरावा करत नाही. कर वसुली करण्यावर तुमचा जादा भर आहे. पण, नवीन योजना राबविण्यासाठी प्रस्ताव देणे, त्यासाठी पाठपुरावा करण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करता.

अधिकार्‍यांच्या रिक्त पदांची भरतीची मागणी करता. दुसरीकडे पालिकेच्या कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार करू शकत नाही. इतर खर्च कमी करून विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्या,’’ अशा शब्दांत सोपल यांनी सावरीकरांना सुनावले.

पंढरपुरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पालखी सोहळा जवळ आला असूनही स्वच्छतेची कामे प्रलंबित आहेत. लोकसहभागातून स्वच्छतेची काम करून घेण्याबरोबर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून चांगली कामे करून घ्या, असा आदेश सोपल यांनी पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र जाधव यांना दिला.

महापौर अलका राठोड, आमदार दीपक साळुंखे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

नगरसेवकांनाही पास द्या
आषाढी वारीत दर्शन पासवरून नेहमीच गोंधळ उडतो. त्याबाबत विचारले असता, सोपल म्हणाले, की पास देण्याचा निर्णय मंदिर समितीचा आहे. काही प्रतिष्ठितांनाच फक्त पास दिले जातात. नगरसेवकांनी मागितल्यास त्यांनही एक-दोन पास द्यावेत, असे सोपल यांनी सांगितले.

वारी मला नवी, प्रशासनाला जुनी
आषाढी वारीमध्ये नियोजन अत्यंत नेटके असून प्रशासनाला त्याचा चांगला अभ्यास आहे. पालकमंत्री म्हणून मला वारी नवी आहे. पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नदी व कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात येईल. रॉकेल, गॅस सिलिंडरचा कोटा वाढवून देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे, असे सोपल यांनी सांगितले.