आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांचा लागणार पहिल्यांदा जिल्ह्यातच कस, जिल्हा बँक संचालकांची सोमवारी सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- दोन्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्याची भाषा सातत्याने करणारे सहकारमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी (दि.१६) कस लागणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल ४५ संचालकांवर १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने दादा (पाटील) यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देणार का, याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेली काही वर्षे प्रशासक कार्यरत आहे.
गेल्या सरकारच्या काळात दाबण्यात आलेल्या चौकशांना सरकार बदलल्यानंतर अचानक गती आली आणि जिल्ह्यातील ४५ संचालकांवर जिल्हा बँकेच्या थकीत १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यामध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, सदाशिवराव मंडलिक, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती आणि आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. मृत संचालकांच्या वारसांनाही रक्कम वसुलीच्या नोटिसा धाडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक आणि ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले. त्याबाबत २५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
महाडिक आणि सहकारमंत्र्यांची जवळीक : काँग्रेसचेविधानपरिषद सदस्य असलेल्या महादेवराव महाडिक यांना कोणत्याही पक्षाचे वावडे नाही. पुतणे धनंजय हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मुलगा अमल भाजप आमदार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या उमेदवारीवर सुनेला जिल्हा परिषदेला निवडून आणले आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीत त्यांची आणि चंद्रकांतदादांची जवळीक वाढली आहे.