आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन कोलमडले, मनपा: पाणी तत्काळ सोडा, पाटबंधारे: २० मे रोजी सोडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- औजबंधारा येथे १.५ मीटर जलसाठा असून ते पाणी शहराला आठ दिवस पुरेल इतकेच आहे. उजनी धरणातून शहरासाठी तत्काळ पाणी सोडले नाही तर २५ मे नंतर शहरावर जलसंकट येणार आहे. २० मे रोजी पाणी सोडू असे पाटबंधारे विभागाने महापालिकेला फॅक्सद्वारे कळवले आहे. असे झाले तर २५ ते ३१ मे अशा काळात शहरावर जलसंकट येण्याची शक्यता आहे.
औज बंधाऱ्यात मंगळवारी १.५ मीटर पाणी होते. पाणी कमी असल्याने टाकळी पंप हाउस येथे सध्या तीन पंप चालू आहेत. चौथा पंप चालू केला तर सहा दिवस पाणी पुरेल, अशी माहिती मनपाचे उपअभियंता आर. व्ही. रेड्डी यांनी दिली.

नियोजनानुसार २० मे रोजी उजनी बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले. पण बंधाऱ्यात २० ते २२ मेपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे १३ किंवा १४ मे रोजी पाणी सोडणे आवश्यक आहे. त्यानंतर औज बंधाऱ्यात २२ मे पर्यंत पाणी पोहचेल, असे आयुक्त काळम-पाटील यांनी सांगितले.
पालक मंत्र्यांकडे केली मागणी
चिंचपूर बंधाऱ्यातील एक मीटर पाणी जलसंपदा विभागाच्या हलगर्जीमुळे वाहून गेल्याने औज बंधाऱ्यातील पाणी दहा दिवस आधी पाणी संपत आहे. त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी मनपाकडून संबंधित विभागाकडे करण्यात आल्याची माहिती सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी पत्रकारांना दिली. वेळेत पाणी सोडावे यासाठी महापौरांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागणी केली. वेळेत पाणी सोडले नाही तर आंदोलन करू, असा इशारा सभागृह नेते हेमगड्डी यांनी दिला.
आठ दिवसांआड पाणी देण्याची वेळ येऊ शकेल
उजनीतून १६ मे पूर्वी पाणी सोडले नाही तर शहरात पाण्याचे नियोजन कोलमडेल. सात ते आठ दिवसांआड पाणी पुरवठा करण्याची वेळ मनपावर येणार आहे.
पाणी संपले कसे ?
औजबंधारा भरला की किमान ६० दिवस पाणी पुरते. टाकळी पंप हाउस येथील चौथा पंप दहा दिवस चालू केला, त्यामुळे फक्त ११५ एमएलडी पाणी जादा घेतले. तरीही ५८ दिवस पाणी पुरणे अपेक्षित होते. दरम्यान, औज बंधाऱ्यातून दोन प्लेट निसटल्याचे सांगण्यात आले.
आमदार शिंदे यांचा जलसंपदा मंत्र्यांना फोन
शहरासाठी पाणी सोडावे यासाठी मंगळवारी दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पाणी सोडण्याची मागणी केली. सोलापूरला पाणी कमी पडू देणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.
प्रणिती शिंदे, आमदार
४० दिवसांतच पाणी संपते कसे?
औज बंधाऱ्यातील पाणी ४० दिवसांत संपते कसे ? शहरासाठी पाण्याचे नियोजन करताना कोठेतरी चूक होत आहे, असे दिसते. पाणी देऊनही शहरात पाणीपुरवठा विस्कळीत आहे. महापालिका पाण्याचे नियोजन करत नाही. त्यामुळे पाण्याचे ऑडिट होणे आवश्यक आहे, ते महापालिकेने करावे.
विजयकुमार देशमुख, पालकमंत्री