सोलापूर- गुलबर्गा रेल्वे विभागाची हद्द गुलबर्गा स्थानकापुरतीच मर्यादित ठेवा. गुलबर्गा ते वाडीचा 40 किमीचा भाग घ्या. मात्र गुलबर्गा-सोलापूर मार्गावरील एकही स्थानक गुलबग्र्याच्या ताब्यात देणार नाही, असे सोलापूर रेल्वे विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे. गुलबर्गा रेल्वे विभाग बनवताना हद्द कुठंपर्यंत असावी, अशी विचारणा मध्य रेल्वे मुख्यालयाने केली होती. त्यावर सोलापूर विभागाने दिलेल्या अहवालात हुबळी विभागातील तडवळ स्थानकास सोलापूर विभागात वर्ग करावे, असे म्हटले आहे.
सध्या सोलापूर विभाग वाडीपर्यंत आहे. गुलबर्गा-वाडी जवळपास 40 किमीचे अंतर. सोलापूर विभाग हा 40 किमी भाग गुलबर्गा विभागास देण्यास राजी आहे. मात्र, रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा ते होटगीपर्यंतचे अंतर मागितले आहे. असे झाले तर होटगीजवळील सिमेंट प्लान्ट गुलबर्गा विभागात समाविष्ट होईल. याचा मोठा आर्थिक फटका सोलापूरला बसू शकतो.
रेल्वे प्रवासी संख्या रोडावली
सोलापूर रेल्वे विभागात या वर्षी तब्बल 45 हजार 553 मेल एक्स्प्रेस गाड्या धावल्या. असे असूनही यंदा 7 लाख प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरवली. याला कारण नव्याने तयार झालेला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग असल्याचे बोलले जाते. यंदा 3 कोटी 50 लाख प्रवाशांनीच रेल्वेला पसंती दिली. असे असले तरीही रेल्वेला गत वर्षाहून जादा उत्पन्न (285 कोटी 59) मिळाले आहे.