आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamal Mapadi President Baba Aadhav News In Marathi

देवस्थानचा निधी विकासासाठी वापरावा, बाबा आढाव यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- केंद्र सरकारने परदेशी उद्योजकांसाठी लाल गालीचे अंथरण्यापेक्षा देशातील श्रीमंत देवस्थानासाठी लाल गालीचे अंथरावेत. त्यांच्याकडे पडून असलेला हजारो कोटी रुपयांचा निधी देशाच्या विकासाठी वापरावा, असे आवाहन हमाल मापाडी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाची विशेष बैठक येथील हमाल भवन येथे नुकतीच झाली. त्यात ते बोलत होते. या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरात, खजिनदार नवनाथ बिनवडे, सहखजिनदार राजकुमार घायाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, ‘देशात सुमारे १० कोटी लोक हे असुरक्षित कामगार म्हणून राबत आहेत. मात्र, त्यांना वृद्धापकाळासाठी कोणतीही सुरक्षितता मिळत नाही. याकरिता सर्व असुरक्षित कष्टकऱ्यांना २ हजार रुपये दरमहा निवृत्तिवेतन मिळावे याकरिता राज्य आणि केंद्र शासनाने विशेष तरतूद करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. गेल्या वर्षी दिल्लीत यासंदर्भात देशभरातील कष्टकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा २ डिसेंबर रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व केंद्रातून हजारो कष्टकऱ्यांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन केले. राज्य सरकारकडे हमाल, मापाडी महामंडळाच्या माध्यमातून पीएफच्या माध्यमातून १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. हा पैसा बिनव्याजी स्वरूपात व्यापारी वापरत आहे. त्या पैशातून कष्टकऱ्यांना निवृत्तिवेतन देणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
सांगून केंद्र सरकारने परदेशी उद्योजकांसाठी लाल गालीचे अंथरण्यापेक्षा देशातील श्रीमंत देवस्थानासाठी लाल गालीचे अंथरावेत आणि त्यांच्याकडे पडून असलेला हजारो कोटी रुपयांचा निधी देशाच्या विकासाठी वापरावा, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या येथील विशेष बैठकीच्या सुरुवातीला जवखेडे (जि.नगर) येथील दलित हत्याकांडामधील मृतांना तसेच पिंपरी चिंचवड येथे ड्रेनेजचे काम करताना मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठकीच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला.
दिल्लीत २ डिसेंबर रोजी आंदोलन
देशातील सर्व असुरक्षित कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी, लोकपाल नियुक्त करण्यात यावा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायम ठेवावी यासह इतर मागण्यांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी देशभरातील कष्टकऱ्यांच्या वतीने दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे, अशीही माहिती डॉ. आढाव यांनी दिली.