सोलापूर- मुलांवर सध्या इंग्रजी माध्यमाचा खूप प्रभाव आहे. परिणामी उर्दू व मराठी माध्यमातून शिक्षण देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाचा र्हास थांबवण्यासाठी प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हामीद इक्बाल सिद्दिकी यांनी केले.
छत्रपती रंगभवन येथे उर्दू अकॅडमीच्या वतीने उर्दू भाषा आणि विचार या विषयावर सिद्दिकी यांचे व्याख्यान झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, डॉ. मुस्तफा पंजाबी, बशीर परवाज, फारूक सय्यद, डॉ. जमील दफेदार, दत्ता सावंत यांची उपस्थिती होती.
सिद्दिकी म्हणाले..
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना इंग्रजी आवश्यक आहे. मात्र आपली मातृभाषाच पुढील पिढी विसरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपली मुले टाकताना त्यांना मातृभाषेच्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी ही पालकांची आहे.
उर्दू फक्त शेरोशायरीसाठी नाही
उर्दू भाषा केवळ शेरो शायरीसाठी नाही. या भाषेत साहित्यही मोठय़ा प्रमाणात आहे. त्याच्या अभ्यास करण्यासाठी उर्दू भाषेतील शिक्षण पुढील पिढय़ांना देण्याची गरज आहे. उर्दू साहित्य प्रगल्भ असल्याचे ते म्हणाले