आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- कामगार कायद्यांपासून मुक्त राहण्यासाठी सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगात ‘युनिट सिस्टिम’ राबवली जाते. ही शासन आणि कामगारांची फसवणूक आहे. कारखाने अधिनियम (फॅक्टरी अँक्ट)नुसारच हा उद्योग चालावा, त्यातील कामगारांना कायदेशीर सोयी-सवलती मिळाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेने केली.
मनसेचे विधिमंडळातील गटनेते बाळा नांदगावकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. सोमवारपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नी लक्षवेधी मांडणार असल्याचे श्री. नांदगावकर म्हणाले.
काय आहे युनिट पद्धत? : एका कारखान्यात दहापेक्षा अधिक कामगार असतील तर कारखाने अधिनियमानुसार कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस आदी द्याव्या लागतात. त्या टाळण्यासाठी युनिट पद्धत वापरतात. त्यात चार यंत्रमागांचे एक युनिट आणि त्याचे स्वतंत्र खाते, त्याचा मालक वेगळा अशी कागदपत्रे तयार करण्यात येतात. एकाच छत्राखाली 8, 16 अथवा 24 यंत्रमाग असले तरी युनिटखाली विभागणी करून त्यांचे स्वतंत्र व्यवहारच कागदोपत्री रंगत असतात. वर्षानुवर्षे असा कारभार चालत आलेला आहे.
कारखाने चालतात असे
कारखाने अधिनियम 1948 च्या सेक्शन 85 अन्वये यंत्रमाग उद्योगाला परवाना दिला जातो. यात एकाच छत्राखालील इतर सदस्यांच्या नावे असलेले यंत्रमाग चालत असतात. कामगारांची संख्या दहाच्या वर असली तरी युनिट पद्धतीनुसार त्यांची विभागणी होते. युनिटमागे चारच कामगार येतात. एका छत्राखाली 50 कामगार असूनही त्यांची विभागणी होत असल्याने सवलती देण्याचा प्रश्न येत नाही. कामगारांना भविष्यच नसल्याने या उद्योगात नवीपिढी येत नाही. सध्या मनुष्यबळाअभावी कारखान्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
विधिमंडळात उत्तर मागू
सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगात लाखाच्या घरात कामगारांची संख्या आहे; परंतु त्यांना कुठल्याच सवलती नाहीत. युनिट पद्धतीने त्यांच्या हक्कावर गदा येत असेल तर उद्योग आणि कामगारमंत्र्यांना याबाबत विधिमंडळात उत्तर द्यावे लागेल.’’ बाळा नांदगावकर, गटनेते मनसे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.