आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला हवेत एक आंबेडकर- प्रा. हरी नरके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाकिस्तानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अलीकडेच सुरू झाली. विचारवंत, पत्रकार मंडळी एकत्र येऊन त्यानिमित्ताने विचारमंथन करतात. त्यातून एकच सूर येतो, हमें भी एक आंबेडकर चाहिए.. भारताची राज्यघटना इतकी मजबूत कशी? ती लष्कराच्या ताब्यात जात नाही, भांडवलदारांच्या खिशात बसत नाही. अशाच राज्यघटनेला पाकिस्तान मुकला. लोकशाही गमावून बसला, अशी खंतही ही मंडळी व्यक्त करतात, असे फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके (पुणे) यांनी येथे सांगितले.
लोकमंगल जीवक हॉस्पिटलचा वर्धापन दिन आणि डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. आधुनिक भारताचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी माजी खासदार सुभाष देशमुख होते. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनेक पैलू उलगडत त्याने देशाची उभारणी कशी झाली, हे प्रा. नरके यांनी सोदाहरण विशद केले.
लिंगभेद, वर्णभेद, जातिव्यवस्था, संसाधनांचे वाटप आणि धर्म चिकित्सा या पंचसूत्रीवर आंबेडकरांनी सुव्यवस्था स्थापण्यास सुरवात केली. स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाचा विकास मोजला पाहिजे, असे सांगत स्त्री-पुरुष समानता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या बाबींची त्यांनी अपेक्षा केली. 27 जानेवारी 1919 रोजी त्यांनी 21 वर्षे पूर्ण करणार्‍या भारतीयांना मताचा अधिकार दिला पाहिजे, असा विचार मांडला. त्यानंतर 10 वर्षांनी काँग्रेसने अशी मागणी केली. देशातल्या कोट्यवधी लोकांना उभे केले. त्यातूनच आधुनिक भारताची उभारणी झाली. लोकशाहीमुळे चर्चा होते. वैचारिक मंथन होते. निवडणूक म्हणजे लोकशिक्षणाची व्यवस्था असावी, असे आंबेडकरांना अभिप्रेत होते. ते आज दिसून येते, असे मत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले.