आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानलाही हवेत डॉ. आंबेडकर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पाकिस्तानात अलीकडेच डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सुरू झाला आहे. तेथील विचारवंत, पत्रकार मंडळी एकत्र येऊन त्यानिमित्ताने विचारमंथन करतात. त्यातून एकच सूर येतो, ‘हमें भी एक आंबेडकर चाहिए...’ भारताची राज्यघटना इतकी मजबूत कशी ? ती लष्कराच्या ताब्यात जात नाही, भांडवलदारांच्या खिशात बसत नाही. अशाच राज्यघटनेला पाकिस्तान मुकला. लोकशाही गमावून बसला, अशी खंतही ही मंडळी व्यक्त करतात,’ असे फुले, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘लिंगभेद, वर्णभेद, जातीव्यवस्था, संसाधनांचे वाटप आणि धर्मचिकित्सा या पंचसूत्रीवर आंबेडकरांनी सुव्यवस्था स्थापण्यास सुरुवात केली. स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाचा विकास मोजला पाहिजे, असे सांगत स्त्री-पुरुष समानता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या बाबींची त्यांनी अपेक्षा केली. 21 वर्षे पूर्ण करणार्‍या भारतीयांना मताचा अधिकार दिला पाहिजे, असा विचार आंबेडकरांनीच मांडला. त्यानंतर 10 वर्षांनी काँग्रेसने अशी मागणी केली,’ असेही नरके यांनी सांगितले.

गणप्या अन् गणपतराव...
निवडणूक म्हणजे लोकशिक्षणाची व्यवस्था असावी, असे आंबेडकरांना अभिप्रेत होते. जुन्या काळात पाटलांच्या वाड्यात सामान्य माणसाला विचारणा व्हायची, ‘आता कसं रं गणप्या..’ त्यावर गणप्या म्हणायचा, ‘तुम्ही म्हणाल तसं मालक.’ आज मते मागणारे पाटील म्हणताहेत, ‘काय म्हणता गणपतराव, लक्ष द्या जरा.’ गणपतराव ही कॉलर टाइट करत म्हणतोय, ‘पाहूया!’ हा बदल केवळ बाबासाहेबांमुळे झाला याकडे प्रा. नरके यांनी लक्ष वेधले.