आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी दोन वर्षे चिंतेची - हर्षवर्धन पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी जलाशयात उणे 27 टक्के साठा आहे. हवामान खाते अंदाजानुसार सरासरी पाऊस पडला तरी ते भरणे कठीणच आहे. सोलापूरकरांचे जीवन उजनीवर अवलंबून असल्याने पुढील दोन वर्षे चिंतेची आहेत, अशी माहिती राज्याचे सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे सांगितली.

जिल्हाधिकारी बहुउद्देशीय कार्यालयात जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि उपायांचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. उजनी जलाशयातील पाणी वाटपाचे नियोजन झाले नाही, त्याची चौकशी वगैरे बाबी भूतकाळातल्या; आता करायचे काय? हाच मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. पुण्यातील भामा-आसखेड जलाशयातून उजनी जलाशयात पाणी सोडण्याच्या प्रश्नाला बगल देत त्यांनी माहिती घेऊ, असे उत्तर दिले.

जिल्ह्यात साखर कारखाने वाढले. उसाचे क्षेत्र वाढले. उजनीच्या डावा आणि उजवा कालव्यातील पाण्याद्वारे उसाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. फक्त 16 टक्के ठिबक सिंचन पद्धत दिसून येते. ही बाब भविष्याच्या दृष्टीने गंभीर आहे. बागायत तालुके असलेल्या माळशिरस, पंढरपूर, माढा आणि करमाळा येथील भूजल पातळी तीन मीटरने खोल गेली आहे. ही स्थिती पाहता, उसाचे उत्पादन ठिबक पद्धतीनेच घ्यावे लागेल. जलसंधारणाची कामे हाती घ्यावी लागतील, असेही त्यांनी सांगितले.

टँकरचे पाणी टाक्यांमध्येच - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी टंचाईग्रस्त गावांसाठी साडेबाराशे पाण्याच्या टाक्या दिल्या. जिल्हाधिकारी सांगतील त्या ठिकाणी त्या पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. टँकरमधून येणारे पाणी या टाक्यांमध्येच सोडायचे आहे. आड किंवा विहिरींमध्ये सोडता येणार नाही, अशा सक्त सूचना आहेत. त्यामुळे टँकरच्या अधिक खेपा होतील, मुबलक पाणी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक र्शीकांत मोरे, शहर निबंधक संजय राऊत यांच्यासह तालुक्यांतील प्रांताधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.