आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी विधेयक पहिल्याच दिवशी मांडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 9 डिसेंबरला नागपुरात सुरू होईल. राज्यपालांनी वटहुकूम काढलेले जादूटोणाविरोधी विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहासमोर चर्चेसाठी सादर करण्यात येईल. एकूण 11 विधेयके सभागृहात येतील, असे संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

पीककर्ज आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 डिसेंबरला चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात होईल.

वारकर्‍यांचा विरोध आणि पाठिंबा
जादूटोणाविरोधी विधेयकाला काही वारकर्‍यांनी विरोध केला तर बहुतांश वारकरी संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हे विधान केले आहे.

ग्रामपंचायत धोरण
मोठय़ा ग्रामपंचायतींसाठी एक नवीन धोरण आखण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

निवडणूक प्राधिकरण पुण्यात
97 व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. त्याचे मुख्यालय पुण्यात असणार आहे. त्यासाठी 45 पदे मंजूर झाली. मुख्य प्राधिकरण आयुक्त पदाला मान्यता मिळाली की, हे कार्यालय कार्यान्वित होईल. त्यानंतर निवडणुकांचे कामकाज सुरू होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

ऊस दराबाबत तोडगा निघेल
साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखानदारी अडचणीत आली. परिणामी ऊस उत्पादकांना चांगला दर देणे कठीण झाले. ही बाब थेट पंतप्रधानांना सांगण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. लवकरच याप्रश्नी तोडगा निघेल, असे श्री. पाटील म्हणाले.