आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांच्या चर्चेचे पुन्हा गुर्‍हाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील जड वाहतुकीमुळे महापालिकेकडून करण्यात आलेले रस्ते 8 पट खराब होत आहेत. अनेक शालेय विद्यार्थ्यांचा नाहक बळी जात आहे. शहराच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ होत आहे. या सर्व कारणांमुळे शहरातून जाणारी जडवाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली. यावर श्री. गेडाम यांनी संयुक्त पथक नियुक्त केले आहे.

पथकात जिल्हा पोलिस, शहर पोलिस, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांचा समावेश आहे. जडवाहतूक वळवण्यासाठी पर्यायी रस्ता कोठून करायचा, याविषयी पथकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शहर पोलिस आयुक्तांना हा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. जड वाहतुकीला पर्यायी रस्ता देण्याविषयी दोन वर्षांपूर्वी झालेल्या चर्चेचे गुर्‍हाळ आता पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. शुक्रवारच्या बैठकीतील निर्णयानुसार जड वाहतुकीच्या पर्यायी रस्त्यांची दुसर्‍यांदा चाचपणी करण्यात येणार आहे. मात्र यातून जड वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार का, याबद्दल प्रश्नच आहे.

शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी गेडाम यांच्याकडे शहरातील जड वाहतूक बंद करण्याविषयी पत्र दिले. पर्यायी रस्ता देण्याबाबत चर्चा झाली. पर्यायी रस्ता कोठून असावा, यावरही खूप वेळ खल करण्यात आला. मुंबईहून विजापूरकडे जाणारी वाहने शिवाजीनगर, केगाव दंत वैद्यकीय महाविद्यालय, पाटील-देशमुख वस्तीमार्गे तिर्‍हे येथून मंद्रूप-तेरा मैल बायपासला जोडता येतील. शिवाय हैदराबाद, तुळजापूरहून विजापूरकडे जाणार्‍या वाहनांना हाच मार्ग देण्याविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक मकरंद रानडे, पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ई. भोसले यांच्यासह नगरसेवक अनिल पल्ली, चेतन नरोटे, मेघनाथ येमूल, दशरथ गोप आदी उपस्थित होते.