आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्याध्यापक अरगशेट्टी यांचा अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विजापूर रस्ता नेहरूनगर येथील जागृती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विठ्ठल गुंडू अरगशेट्टी (वय 58, रा. मंत्री-चंडक विजापूर रोड) यांचा शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला शाळेतून घरी मोटारसायकलवरून जाताना सैफुलकडून येणार्‍या मोटारसायकलची जोरदार धडक बसल्याने ते जखमी झाले होते. दरम्यान, अपघात होऊन 48 तास लोटले तरी चालकाचा शोध लावण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आले नाही.

अरगशेट्टी हे मागील 37 वर्षांपासून शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार होता. गुरुवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर मोटारसायकलवरून ते घरी जात होते. नेहरूनगरजवळ दुभाजक ओलांडण्यासाठी ते थांबले होते. सैफुलहून येणार्‍या भरधाव मोटारसायकलची (एमएच 13 बीबी 3625) धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. मोटारसायकल चालकाला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार बाबूराव पवार तपास करीत आहेत.

3 जूनला मुलांचा लग्न सोहळा
अरगशेट्टी यांच्यामागे पत्नी अंबुबाई या गृहिणी आहेत. मुलगा सुधीर हा एमबीए पदवीधर असून खासगी कंपनीत कार्यरत आहेत. मोठी मुलगी रेखा यांचा विवाह झाला असून लातूर जिल्ह्यात त्या ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. तिसरी मुलगी अश्विनी बी.ए.डी.एड. पदवीधारक आहे. तीन जून रोजी मुलगा सुधीर व मुलगी अश्विनी यांचा विवाह होणार आहे. लग्नाची तयारी घरात सुरू होती. मंगलकार्यालयही बुक झाले आहे. त्यापूर्वीच वडिलांचा हा दुर्दैवी अपघात झाल्यामुळे नातेवाइकांना मोठे दु:ख झाले आहे.

नेहरूनगर चौकात वाहनांची गर्दी
नेहरूननगर चौकातील बस स्टॉपवर रिक्षा, जीप व अन्य वाहनांची नेहमी गर्दी असते. एकाही वाहनचालकाला शिस्त नाही. काही वाहने रस्त्यावर बेशिस्त थांबविलेली असतात. यामुळे नेहमी किरकोळ अपघात होतात. परिसरातील नागरिकांकडून यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.

31 मे रोजी निवृत्त होणार होते
विठ्ठल अरगशेट्टी हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच शाळेतील शिक्षक, नातेवाइक यांची गर्दी झाली होती. अरगशेट्टी यांच्यावर सायंकाळी सातच्या सुमाराला मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.