आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता होणार आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे मूल्यांकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार केले, किती रुग्णांना दाखल करून घेतले, रुग्णालयातील स्वच्छता याचा चोख हिशेब आता सरकारी डॉक्टरांना ठेवावा लागणार आहे, कारण या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेतून (एनआरएचएम) लाखो रुपयांचा निधी सरकारी रुणालयांना मिळाला आहे. अद्ययावत उपकरणेही खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतरही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता समाधानकारकपणे सुधारत नाही, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी रुग्णांकडून होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गणुवत्ता वाढवण्यासाठी ग्राम संजीवनी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत होणार आहे. यापूर्वी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामाचे मूल्यांकन करता येत नव्हते. योग्य मूल्यांकन करून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

असे आहेत नव्या मूल्यांकनाचे निकष
या नव्या मूल्यांकन पद्धतीत सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी बाह्यरुग्ण विभागात किती जणांवर उपचार केले, याची नोंद ठेवली जाणार आहे. किती रुग्ण रुग्णालयात दाखल केले, किती जणांवर प्रतिबंधात्मक उपचार केले, याची माहिती मूल्यांकन पद्धतीत घेतली जाणार आहे. अशा आधारावर हे मूल्यांकन करण्यात येईल, सर्व योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे का, हे यात तपासले जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, तेथील लोकसहभाग यांनाही स्वतंत्र गुण देण्यात येतील या प्रत्येक निकषांना वेगळे गुण देऊन त्या अधारावर मूल्यांकन करण्यात येणार आहे.

नवीन आर्थिक वर्षापासून सुरुवात
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मूल्यांकनाचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्यावर लवरकच अंतिम निर्णय घेण्यात येईल. नवीन आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. ’’ प्रभाकर देशमुख, आयुक्त, पुणे विभाग

सेवा सुधारण्यासाठी मूल्यांकन आवश्यक
नव्या पद्धतीच्या मूल्यांकनामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य सेवेत सुसूत्रता येणार आहे. तसेच गुणवत्तेमध्येही सुधारणा होणार आहे. याबाबत सूचना आल्या आहेत. याच्या अंमलबजावणीस जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी मूल्यांकन आवश्यकच होते.’’ डॉ. सुनील भडकुंबे, जिल्हा आरोग्याधिकारी.