आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उत्तरा’ने धो धो धुतले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेला महिनाभर विर्शांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोरदार हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाची सलग रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात गुरुवार (दि. 19) अखेरपर्यंत सरासरी 422.29 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. पण आतापर्यंत तो सरासरी 469.60 मिलिमीटर झाला आहे. मागील वर्षी याच महिनाअखेरपर्यंत 262 मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, बाश्री, दक्षिण सोलापूर, मंगळवेढय़ात ओढे, नाले वाहू लागले आहेत. काही ठिकाणी शेतीचे बांध फुटले, काही ठिकाणी शिवारांची तळी झाली.

जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी आहे. यंदा खरिपात मृग नक्षत्रापासूनच पावसाने चांगली सुरुवात केली. त्यामुळे आशा निर्माण झाल्या होत्या. पण ऑगस्टपासून त्याने प्रदीर्घ विर्शांती घेतल्याने चिंता व्यक्त होत होती. मुळात ऑगस्ट-सप्टेंबर असा उशिराचा पाऊस जिल्ह्यात पडतो. पण सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा सुरू झाला, तरी पाऊस पडत नव्हता. अखेरीस गणेश विसर्जनादिवशी पुन्हा त्याने पुनरागमन केले आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात त्याने हजेरी लावली.

पावसाचा जोर इतका राहिला की, गेल्या दोन वर्षापासून कोरडेठाक असलेले ओढे, नाले भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शिवारांची तळी झाली आहेत. मंगळवेढय़ात बोराळेकडील वाहतूक ठप्प झाली. सीना नदीत बर्‍यापैकी पाणी आले आहे. दक्षिण सोलापुरात मंद्रूपचा सीतामाई तलाव भरून वाहू लागला निंबर्गी येथे लोकमंगलने उभारलेला तलाव भरून वाहत आहे. वडकबाळ येथे सीना नदीच्या पात्रातील पुलावरून पाणी वाहते आहे. बाश्री शहर व परिसरातही जोरदार पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. वैराग भागात तर अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले. काही छोटे पूलही वाहून गेले. मोहोळ तालुक्यातही पावसाचा जोर गेल्या दोन-तीन दिवसांपासून कायम आहे. सांगोल्यातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. वीरमधून नीरेत विसर्ग सोडल्याने चंद्रभागाही दुथडी भरली आहे.