आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरे यांच्याकडून एव्हरेस्टवीराला सहाय्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यास शुभेच्छांसह एक लाख 51 हजाराची भरीव मदत मिळाली. आनंदने मदतीचा स्वीकार करत मनसेने दिलेली ही शाबासकीची थाप मोलाची व प्रेरणा देणारी असल्याची भावना व्यक्त केली. एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेच्या खर्चाचा डोंगर आनंद बनसोडेवर आहे, म्हणूनच अशा बिकट प्रसंगी मिळालेली मदत अनमोल असल्याचे तो म्हणतो.

मुंबई येथील कृष्णकुंज येथे सकाळी अकरा वाजता झालेल्या छोटेखानी समारंभात शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते आनंदने या धनादेशाचा स्वीकार केला. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने घर कर्जामुळे घर विकण्याची वेळ आली असल्याची खंत सोलापुरातील प्रसारमाध्यमांतून व्यक्त केली होती. त्यानंतर सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

खेळ व खेळाडूच्या मदतीसाठी मनसे आपला हात सहज पुढे करते. त्यालाच अनुसरून राज ठाकरे यांनी आनंदला मुंबईत बोलावून एक लाख 51 हजारांचा धनादेश दिला. यावेळी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, सोलापूर जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, उमेश रसाळकर, नीलेश झेंडे, पंढरी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, एव्हरेस्टवीरांना महाराष्ट्र शासनाने तरी भरीव मदत केली पाहिजे. क्रीडा निधीतून या साहसी वीरांना मदत मिळावी. जेणेकरून इतरांनाही प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोलापूरचा आहे. सुमारे वीस ते बावीस लाख रूपये कर्जाचा डोंगर उचलून त्याने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट सर केला. हा भीमपराक्रम झाला असला तरी डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कसा उतरवणार, ही चिंता आनंदला सतावत होती. राहते घर विकण्याची वेळ आनंद व त्याच्या कुटुंबीयावर आली होती.
भक्कम मदत आर्थिक अडचणीत असलेले एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व बयाजी माने (लाल शर्ट) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत आर्थिक मदत देण्यात आली. छाया : संदीप महाकाल