आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द तिची : एसटीच्या लाल रंगाने ‘तिच्या’ जीवनात हिरवळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नवर्‍याने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यातून सुटण्यासाठी त्याने 2007 मध्ये उळे येथील पुलावरून बायकोला खोल पाण्यात ढकलून दिले आणि स्वत:ही उडी घेतली. पुढे नवर्‍याचे काय झाले माहीत नाही. तो बेपत्ता झाला. पण ती वाचली. आईकडे आली. आईने जबाबदारी घेतली. आईने बळ दिले म्हणून ती पुन्हा नव्याने भाकरीच्या शोधात बाहेर पडली.

आयटीआयचे शिक्षण तिच्या कामी आले. एसटी बस रंगवण्याच्या कामातून तिला आधार मिळाला. हाच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सुमित्रा गावडे यांची ही जीवनकहाणी आहे.दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमित्राने लग्नानंतर 1997 मध्ये आयटीआयचे जनरल रंगकामाचे शिक्षण घेतले. हेच शिक्षण त्यांना 2007 च्या नव्या वळणावर कामी आले.
लाल रंग हे धोक्याचे प्रतीक. माझ्या आयुष्यात याच लाल रंगाने हिरवळ आणली. आता चार घास सुखाने खातोय ते या लाल रंगाच्या कामामुळेच, असे सुमित्रा अभिमानाने सांगतात.


कामाचे स्वरूप
एक वर्षाहून अधिक कालावधीनंतर ज्या एसटी गाड्या वर्कशॉपला येतात त्यांचे रंगकाम करणे हे त्यांचे मुख्य काम. नव्या एसटीच्या नंबर प्लेटवर नंबर लिहीणे, शिवाय छोटे छोटे नियम व काही सूचना, आसन क्रमांक, छोट्या छोट्या स्पेअर पार्टस्ना रंगवण्याचे कामही त्या करतात.

विरोधही मावळला
सुरुवातीस या कामाकडे वळल्यावर समाजातील काही घटकांचा सुमित्रा गावडे यांना त्रास झाला. पुढे मात्र जी बोटे नावे ठेवण्यास पुढे येत तीच कौतुकाच्या दिशेने वळाली. एसटी नव्याने चकाकू लागतात तेव्हा त्यांना अतीव आनंद होतो, असे सुमित्राताई सांगतात.


उभे राहिले सबंध घर
वडील बसवेश्वर यांच्या अचानक जाण्याने सुमित्रा पूर्णपणे कोलमडून पडल्या. त्यांचा एक भक्कम आधार गमावला होता. यावेळी आई गंगूबाईने साथ दिली. त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास प्रोत्साहन दिले आणि सगळे घर पुन्हा उभे केले.