आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्च् शिक्षणातील टक्का गुणवत्तेसह वाढण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उच्च शिक्षणातील टक्का वाढवण्याबरोबरच गुणवत्ता वाढली पाहिजे. पण त्यासाठी अँक्सेस, इक्विटी, रिलेशन्स, क्वॉलिटी, रिसोर्सेस व गव्हर्नन्स या मुद्दय़ांवर विद्यापीठांनी भर दिला पाहिजे, तरच ‘व्हिजन 2020’ साकारू शकेल, असे मत डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पोवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर केवळ 19 टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच उच्च शिक्षण पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.

सोलापूर विद्यापीठाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण झाले. त्यानंतर मुख्य सभागृहात कार्यक्रमास प्रारंभ झाला.

या वेळी डॉ. पोवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, कुलसचिव अँड. शिवशरण माळी यांची उपस्थिती होती.

डॉ. पोवार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या 66 व्या वर्षानंतरची उच्च शिक्षणातील भारताची सद्य:स्थिती अभ्यासली पाहिजे. 1947 मध्ये दोन लाख विद्यार्थी होते, ती संख्या आज दोन कोटींवर पोहोचली आहे. त्यावेळी 18 विद्यापीठे होती, त्यांची संख्या आज 750 विद्यापीठांवर पोहोचली आहे. त्यावेळी 591 महाविद्यालये होती, ती आज 35 हजार 500 महाविद्यालये झाली आहेत. मात्र, अजून अपेक्षा खूप आहे. कोरियासारख्या देशात 100 टक्के विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळते. भारतात उच्च शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्यामागे 450 डॉलर खर्च केला जातो, तर विकसित देशात हा खर्च 35 हजार डॉलर इतका खर्च केला जातो. ही तफावत बरेच काही सांगून जाते. राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग यांनी सर्व मुद्दय़ांना स्पर्श करणारा उच्च शिक्षणाचा अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी पुरेपूर होणे बाकी आहे. मात्र, ही जबाबदारी केवळ विद्यापीठांची नाही तर समाजाचे योगदान व सहकार्य मिळणेही अपेक्षित आहे. हा दर्जा वाढवण्यासाठी वरील सहा सूत्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’

कुलसचिव श्री. माळी यांनी विद्यापीठ कामकाजाचा आढावा सादर केला. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रशांत नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी आभार मानले.

कुलगुरू डॉ. मालदार म्हणाले..
सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाला ‘बारा ब’ची मान्यता मिळू शकली. पुढील काळात नॅक मूल्यांकन करून घेणे हे महत्त्वाचे काम करायचे आहे. प्राध्यापकांचा संप झालेला असतानाही विद्यापीठ परीक्षा विभागाने वेळेत निकाल जाहीर केले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल कुलपती कार्यालयाकडून विशेष कौतुक झाले. परीक्षेच्या संदर्भात राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशींची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

जिल्हाधिकारी गेडाम म्हणाले..
नऊ वर्षांत सोलापूर विद्यापीठाने चांगली प्रगती केली. भारतात उच्च् शिक्षण घेणार्‍यांची संख्या वाढली. मात्र, बेरोजगारांची संख्यादेखील वाढते आहे. ही चिंतेची बाब आहे. जगातील सवरेत्तम अशा 100 विद्यापीठांमध्ये भारतातील विद्यापीठे का नाहीत याचा विचार उच्च् शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी करावा.

रक्तदान शिबिर
सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अक्षय ब्लड बँकेतर्फे घेतलेल्या शिबिरात 60 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. सामाजिक शास्त्रे संकुलात शिबिर झाले. उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. के. बी. पोवार यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ. मालदार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, डॉ. बी. एन. कांबळे, प्रकाश व्हनकडे, अक्षय ब्लड बँकेच्या डॉ. वर्षा सूळ उपस्थित होते.