आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय इच्छाशक्तीने भरेल हिप्परगा तलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराचा परिसर वाढल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे उद्योगधंदे वाढत असून त्यांच्याकडूनही पाण्याची मागणी वाढलेली आहे. तीन ठिकाणांहून होणार्‍या पाणीपुरवठ्यावर शहराची भिस्त आहे. समांतर उजनी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहेत. मात्र, त्यातील बहुतांश पाण्याचा राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या वीज प्रकल्पासाठी वापर होणार आहे. कालव्याद्वारे हिप्परगा तलावात पाणी आणण्याची योजना आहे. मात्र, ती प्रत्यक्षात येण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचे बळ मिळाल्याखेरीज त्याला गती येणार नाही.

जलवाहिनीस वारंवार गळती आणि वीज भारनियमन यामुळे शहरावर जलसंकट वारंवार येते. यावर तोडगा काढण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सीना-भोगावती-एकरुख जोड कालवा झाल्यास हिप्परगा तलावात गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणी येऊ शकते.

हिप्परगा तलावात गाळ
नगरसेवक प्रवीण डोंगरे यांनी या योजनेचा प्रस्ताव तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे दिला. तो त्यांनी राज्य सरकारकडे सोपवला. त्यानंतर जलसंपदामंत्री अजित पवार यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काम सुरू आहे. हिप्परगा तलावाची क्षमता 3.10 टीएमसी (हजार दशलक्ष घन फूट) आहे. त्यापैकी एक टीएमसी गाळ आहे. गाळ काढण्याचे शासन पातळीवर प्रयत्न झाले नाहीत. पण, शेतकर्‍यांना गाळ काढून घेण्यास मुभा देण्यात आली. त्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र. त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

समांतर जलवाहिनीचे काय?
उजनी ते सोलापूर आता एक जलवाहिनी असून, एनटीपीसीकडून शहरासाठी एक नवीन लाइन टाकण्यात येणार आहे. महापालिकेने तिसरी समांतर जलवाहिनी टाकण्याचा आराखडा तयार केला. हिप्परगा तलावात कालव्याद्वारे पाणी आणणे उन्हाळ्यात शक्य नाही. त्यामुळे हिवाळ्यात याचा उपयोग होणार आहे.
69.300 किमी बोगदा
महादेववाडी येथून जोड कालवा व बोगद्याद्वारे सीना व भोगावती नदीवर जलसेतू बांधून दोन्ही नदी ओलांडून एकरुख तलावात पाणी आणणे योग्य वाटते. यांची लांबी 69.300 किमी आहे. अपेक्षित खर्च सुमारे 750 कोटी आहे.

फायदा काय होईल?
हिप्परगा तलावात पाणी आणण्यासाठी फक्त एकच ठिकाणी आणि पावसाळ्यात चार महिने उपस करावा लागेल. गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणी येत असल्याने दरवर्षी सुमारे 25 कोटींचे वीजबिल वाचेल. शहराला 25 ते 30 एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी मिळेल. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा पुढील 50 वर्षे करता येईल. उन्हाळ्यातील वीज भारनियमनाच्या काळातही पाणीपुरवठा सुरळीत राहील.

भविष्यातील नियोजन
शहरास रोज दरडोई 135 लिटर पाणी लागते. सन 2039 च्या नियोजनानुसार 24.70 लाख लोकसंख्या गृहीत धरून 454 एमएलडी पाणी लागणार आहे. त्यासाठी 2009 च्या दरानुसार 900 कोट रुपये खर्च होणार आहे.
सन 2060 मध्ये 645 एमएलडी पाणी लागणार आहे. त्यानुसार 8 टीएमसी पाण्याची तरतूद करावी लागणा आहे.
प्रस्ताव मांडला होता
४शहराला रोज पाणीपुरवठा करण्यासाठी कालव्यातून हिप्परगा तलावात पाणी येईल असा प्रस्ताव महापालिका व राज्य शासनाकडे दिला. पण, त्याची दखल अद्याप घेतली नाही. जलवाहिनीला 1500 कोटी खर्च करण्यापेक्षा निम्मा 750 कोटी रुपये खर्च केल्यास रोज पाणीपुरवठा करणे शक्य आहे.’’
प्रवीण डोंगरे, नगरसेवक

कोट्यवधी रुपयांची वीज
बचत
४ 1850 ते 1950 या काळातील शहराच्या पाणीप्रश्नाची माहिती जाणून घेतली. उजनीतून हिप्परग्यात पाणी आणावे. बोगद्याच्या बाजूने वृक्षारोपण करावे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. भवानी पेठेत पाणी ग्रॅव्हेटीने येईल. यामुळे मनपाचे दरवर्षी होणारे कोट्यवधी वीज बील वाचेल. हिप्परगा परिसर पिकनिक पॉइंट होईल.’’
कल्याणी पसारे, ज्येष्ठ नागरिक
हिप्परगा तलावात पाणी येईल
४ उजनी धरणातून कालव्याद्वारे हिप्परगा तलावात पाणी येईल. काही वेळा चाचण्या घेण्यात आल्या. काही विशिष्ट पातळीपर्यंत पाणी तलावात येईल. पावसाळ्यात धरणातील पाणी नदीऐवजी कालव्यात सोडण्यासाठी प्राधान्य देता येईल.’’
अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, उजनी लाभक्षेत्र विकास
पाणी आणणे शक्य आहे
४कालव्यातून हिप्परगा तलावात पाणी आणणे शक्य आहे. पावसाळ्यात उजनीतून नदीत पाणी सोडून वाया घालवण्यापेक्षा हिप्परगा तलावात दोन ते तीन टीएमसी पाणी साठवण करता येईल. हिप्परगा येथे पंपिंग करून तलावात पाणी सोडता येईल. तसे केल्यास रोज वा दिवसाआड पाणी देता येईल.’’
विजय राठोड, प्र. सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा