आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात उद्या रंगगाड्यांची मिरवणूक पाण्याविना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रजपूत समाजबांधवांनी धुलिवंदनदिनी बुधवारी रंगगाड्यात पाणी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिरवणुकीत पूजेतील अभिषेकाच्या पाण्याचा एक कलश व कोरड्या रंगांचा वापर करण्यात येणार आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे सुमारे 25 हजार लिटर पाणी वाचेल, असा अंदाज आहे.

पिंपात रंग घेऊन बैलगाड्यांची मिरवणूक काढण्याची सुमारे 250 वर्षांची परंपरा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिला यंदा फाटा देण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. चौपाड येथील बालाजी मंदिरात सायंकाळी सात वाजता पंचांची बैठक झाली. तीत समाजातील प्रमुख लोक उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’च्या टिळा होळीच्या आवाहनास प्रतिसाद देत हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. निर्णयाचे स्वागत आणि संकल्पही गुलालाचा टिळा लावून करण्यात आला.

बैठकीस संजयसिंह चौहान, उज्वल दीक्षित, संजय दुबे, शेखर परांडेकर, मंगलसिंह ठाकूर, अमित पवार, विजयसिंह चौहान, वीरेंद्रसिंह चौहान, किरणसिंह पवार, माणिक कोळेकर, जयराज बायस, अँड. प्रदीपसिंह राजपूत, राजू इटाई, प्रतापसिंह चौहान, किरणसिंह पवार, रणजित परदेशी आदी उपस्थित होते.

पाण्याची बचत
"समाजाच्या वतीने हा धाडसी निर्णय घेण्याचे ठरविले आहे. शहरवासीयांनीही याचे पालन केले तर बरीच पाण्याची बचत होईल. केवळ टिळा लावून रंगपंचमी साजरी करावी.’’
-उज्ज्वल दीक्षित

कोरडे रंग खेळा
"केवळ आमच्याच मिरवणुका नाहीत तर शहरात नागरिकही मोठय़ा प्रमाणावर रंगपंचमी मोठय़ा उत्साहात साजरी करतात. टंचाई पाहता पाणी बचत हेच उद्दिष्ट ठेवून कोरडे रंग खेळावेत.’’
-प्रतापसिंह चौहान

बालाजी मंदिरात शुचिर्भूत
वर्षभरात घरात निधन झालेले असल्यास संबंधितांनी चौपाड येथील बालाजी मंदिरातच शुचिभरूत विधी करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. पूर्वी घरी जाऊन शुचिभरूत केले जात असे.

रजपूत समाज पंचमंडळी आणि समाजबांधवांच्या रंगाविना रंगपंचमी साजरी करण्याच्या बैठकीत टिळा लावून टिळा होळी खेळण्याचा संकल्प करताना उज्ज्वलसिंह दिक्षीत, संजय चौहान, मंगलसिंह ठाकूर, रणजित परेदशी, संजय दुबे आदी.

गीते व सुके रंग
"सालाबादप्रमाणे सवाद्य मिरवणूक निघेल. पाण्याऐवजी कोरडे, नैसर्गिक रंग खेळणार आहोत. शहरवासीयांनी याचा अवलंब करावा. त्यामुळे पाण्याची बचत होईल.’’
-संजयसिंह चौहान

तोट्या लावणार
"समाजबांधवांकडून वर्गणी घेतली जाते. परंतु, यावर्षी थोडी जास्त वर्गणी जमवून मिरवणूक मार्गावरील उघड्या नळांना तोट्या लावण्याचे विधायक काम करण्याचा मानस आहे.’’
-अँड. प्रदीपसिंह राजपूत

अशी होईल पाणी बचत
मिरवणुकीत पाच बैलगाड्यामध्ये प्रत्येकी तीन पिंप असतात. एका पिंपात 200 लिटर पाणी मावते. सुमारे तीन हजार लिटर पाणी वाचेल. मिरवणुकीवर लोक रंग ओततात. त्यांनाही कोरड्या रंगाचे आवाहन केले आहे. त्यामुळे आणखी पाच हजार लिटर पाणी वाचेल. रंग धुवून काढण्यासाठी जादा पाणी लागणार नाही. त्यामुळे एकूण 25 हजार लिटर पाणी वाचेल.

सर्वांनीच हे करावे
"रजपूत समाजाने केलेला संकल्प सर्वांनीच स्वीकारला तर हजारो लिटर पाण्याची बचत होईल. पाणी हे जीवन आहे. त्याचा गांभीर्याने विचार व्हावा ही अपेक्षा.’’
-अमित पवार

अशी होईल रंगपंचमी
कोरड्या व नैसर्गिक रंगांची टिळा होळी
मिरवणूक मार्गावर लावणार नळांना तोट्या
वाटणार पाणीबचतीचे प्रबोधनपर पत्रके
गरजूंना देणार पाण्याचे दोन पिंप भेट