आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरडा रंग वापरून वाचवले पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-येथील राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदनाच्या दिवशी रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात येते. परंतु पाणी वाचवण्यासाठी गेल्या वर्षीपासून टिळा होळी सुरू केली. यंदाही कोरड्या रंगांनी समाजबांधव रंगून गेले. लाखो लिटर पाणी वाचवले. सोमवारी दुपारी चौपाड येथील बालाजी मंदिरपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘फाग’ (गीते) म्हणत त्यांनी पाणी वाचवण्याचा संदेश दिला.
राजपूत समाजाच्या या उपक्रमाला सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा आहे. बैलगाड्यांवर रंगांचे पिंप ठेवून रस्त्याच्या दुतर्फा रंग उडवण्याची ही प्रथा. परंतु गेल्या वर्षी दुष्काळ होता. सर्वत्र पाण्याचा ठणठणाट होता. अशा स्थितीत पाणी वाचवणे गरजेचे होते. ‘दिव्य मराठी’ने ‘टिळा होळी’चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत समाजाने कोरड्या रंगांनी उत्सव साजरा केला. यंदा गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शहरातील झोपडपट्टय़ांमध्येही पडझड झाली. अशा स्थितीत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय समाजाने घेतला. त्यालाही समाजबांधवांनी प्रतिसाद दिला.
चौपाड येथून निघालेली ही मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, पूर्व मंगळवार पेठ, मधला मारुती, माणिक चौक, नवी पेठमार्गे पुन्हा चौपाड येथील बालाजी मंदिरात विसजिर्त झाली. तिथे महाआरती करण्यात आली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष संजयसिंह चौहन, सचिव उज्‍जवल दीक्षित, अमितसिंह पवार, मुकेशसिंह ठाकूर, मनजितसिंह ठाकूर, वीरेंद्रसिंह चौहान, सूरजसिंह चौहान आदी उपस्थित होते.
रंगपंचमी : पाण्याचा अपव्यव टाळा
रंगपंचमी, होळी सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा सण आहे. त्यामुळे रंगांची उधळण करताना दुसर्‍यांना त्रास होऊ नये याचा विचार करावा. शहर-जिल्ह्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळावा. शरीराला व त्वचेला इजा होतील अशा रंगांचा वापर करू नये. रंगांची उधळण करून सर्वांनी आनंददायी रंगपंचमी साजरी करावी. प्रणिती शिंदे, आमदार
डोळे व त्वचेची कळजी घ्यावी
रंगपंचमी खेळताना केस, डोळे आणि त्वचेची काळजी घ्यावी. रंगांमध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे त्वचेचा दाह, फोडे येऊ शकतात. तसेच काही जणांना अँलर्जी देखील असते. रंगांमध्ये ग्लास पार्टिकल्सही असतात. डोळ्यात रंग गेला तर धोका होतो. त्यामुळे रंगपंचमी खेळत असताना त्वचेला खोबर्‍याचे तेल किंवा सनस्क्रिन लावून रंग खेळावा. डॉ. सचिन कोरे, त्वचारोगतज्ज्ञ
इकोफ्रेंडली रंगांचा वापर करा..
रंगपंचमी म्हणजे उत्साह आणि आनंद. रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून केमिकल, रसायनयुक्त रंग वापरू नका. इकोफ्रेंडली (नैसर्गिक) रंग वापरा. फुग्यातून रासायनिक रंग फेकल्यानंतर अनेकांना डोळे गमवावे लागले आहेत. कायमस्वरूपी शरीरावर अपंगत्व येऊ देऊ नका. कुणाचा आनंद हिरावू नका. रंगपंचमीचा आनंद घेताना कोरड्या रंगांचा वापर करावा. मकरंद रानडे, पोलिस अधीक्षक