आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holiday Planing : Take For Traveling Railway Bogi

सुटीचे नियोजन : प्रवासाला बोगीच घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उन्हाळी सुट्या लागत आहेत. प्रत्येक जण सुटीतील प्रवासाचे नियोजन करत आहेत. रेल्वेने प्रवास करण्याचे अनेक जण ठरवत आहेत. समूहाने प्रवास म्हणजे रोजच्या ताणतणावातून मुक्ती आणि मनसोक्त आनंद लुटणे असते. आपला प्रवास अधिक आनंददायी व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र डबाच आरक्षित करण्याची व्यवस्था केली आहे. प्रसंगी स्वतंत्र रेल्वे गाडीही आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेचा स्वतंत्र डबा आरक्षित करणे थोडे महागडे असले तरी त्याचा लाभ घेण्याकडे प्रवाशांचा कल दिसत आहे.


असा करा डबा आरक्षित
डबा अथवा रेल्वे आरक्षित करण्यासाठी रेल्वेकडे (मध्य रेल्वे, मुंबई) अथवा भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी, मुंबई कार्यालय) यांच्याकडे अर्ज करू शकता. हा अर्ज प्रवासाच्या तारखेपूर्वी 30 दिवस ते सहा महिन्यांत करावा. रेल्वे कार्यालयात एका डब्यासाठी 50 हजार रुपयांचा डीडी ठेव स्वरूपात अर्जासोबत जमा करावा. आयआरसीटीसीकडे नोंद करत असाल तर प्रत्येक बोगीसाठी 25 हजार रुपयांची ठेव आवश्यक आहे. डब्यांच्या संख्येवर ठेव अवलंबून आहे.

डब्यासाठीचा नियम
डबा आरक्षित करण्यासाठी तो प्रवास किमान 500 किलोमीटरचा असावा. जर त्याहून कमी अंतर असेल तर त्यासाठी 500 किमीचे दर लावले जातील. हा प्रवास सात दिवसांपेक्षा कमी असायला हवा. अधिक दिवसांचा प्रवास असेल तर दिवसामागे 10 हजार दर आकारले जाते. प्रवासात एखाद्या स्थानकावर थांबायचे असल्यास प्रत्येक डब्यासाठी एका तासाला 600 रुपये मोजावे लागतील.


प्रवास का होतो महागडा
रेल्वेच्या अन्य प्रवासापेक्षा डबा अथवा रेल्वे आरक्षित करणे महाग ठरते. नेहमीच्या तिकीट दरापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. कारण, रेल्वेकडे डब्यांची कमतरता मोठय़ा प्रमाणात आहे. दरवर्षी भारतीय रेल्वेला 10 हजार डब्यांची गरज आहे, मात्र तयार होतात 3500. मोठी तफावत असल्याने स्वतंत्र डब्याचा दर अधिक असतो. प्रवास ज्या स्थानकावरून सुरू होणार आहे, त्या ठिकाणी येताना ती रिकामी आणावी लागते. त्यामुळे त्याच्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम एकूण प्रवासात समाविष्ट करण्यात येते. शिवाय विकास कर, आरक्षण, सेवा कराचीही यात भर पडते.


स्वतंत्र तिकिटाची गरज नाही
डबाच आरक्षित असल्याने प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र तिकीट काढावे लागत नाही. मात्र, त्या प्रवासाचे तिकिटाचे दर एकूण खर्चात समाविष्ट असतात. यासाठी एका व्यक्तीच्या नावाने पेपर तिकीट काढले जाते.
ज्याना ग्रुपने लांबपल्ल्याच्या प्रवासाचा आनंद घ्यावयाचा आहे अशांनी डबा आरक्षित करणे चांगले. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने ही सुविधा दिली आहे. याअंतर्गत भारतात कोठेही फिरू शकता.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक