आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगात रंगले सोलापूरकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-‘होली के दिन दिल खिल जाते है, रंगो में रंग मिल जाते है..’ असाच प्रत्यय शहरातील रस्तोरस्ती अन् सोसायट्यांमध्ये होता. बालगोपाळांसह वयस्कही उत्साहात रंगाची उधळण करत शुक्रवारी सहभागी झाले होते. काहींनी मात्र पाणी समस्येचे सामाजिक भान राखत कोरडा रंग ऐकमेकांना लावून रंगपंचमी खेळली. दिवसभर मित्र आप्तेष्टांना रंग लावण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर तरुण-तरुणींचे जथ्ये फिरताना दिसत होते.
गेल्यावर्षी दुष्काळाचे भीषण सावट सोलापूर परिसरावर होते. त्यामुळे समाजाच्या वतीने सामूहिक पध्दतीने खेळल्या जाणरा रंगोत्सव कोरडाच खेळला गेला होता. यंदा मात्र अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व उघडून पाण्याच्या वर्षावात मनसोक्त रंगपंचमी खेळली जात होती.
तरुणाईचा जल्लोष
चौका-चौकात साऊंड सिस्टिम उभी करून पाण्याचे बॅरेल ठेवून रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमीच्या गीतावर तरुण बेधुंद नाचत होते. जुळे सोलापूर, विजापूर रोड, आसरा चौक, आदी भागात आनंदालाच जणू उधाण आले होते. काही सोसायट्यांत मारवाडी, गुजराती आणि जैन समाजात रंगपंचमीनिमित्त थंडाईचा आस्वाद घेतला जात होता.
जाखोटिया कुटुंबीयांचा गोडवा
जाखोटिया व तोष्णीवाल कुटुंबात गेल्या चाळीस वर्षांपासून वेगळीच पंरपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशी ते आपल्या मित्रमंडळींना आमंत्रण देतात. जिलेबी, समोसा, वडापाव, पाव चटणी, पापडी, थंडाई आदी खाद्य पदार्थांची कुटुंबात रेलचेल असते. कोरडा रंग लावून रंगोत्सव खेळतात. ही परंपरा गिरीष जाखोटिया आणि त्यांचे बंधू चालवत आहेत.
जावईबापूंचा मान
लग्नानंतरच्या पहिल्या रंगपंचमीला जावईबापूंना पूर्व भागात खूप मान देतात. त्याला मेहुण्याकडून साखर आणि खोबरेचा हार घालून त्याच्याकडून खुशी घेतली जाते. रंगाची मुक्तपणे उधळण केली जाते. खुशीच्या स्वरूपात तो मेव्हण्याला पार्टी देतो.
‘हरी पद्म’चा शॉवर : सम्राट चौक परिसरातील हरी पद्म अपार्टमेंटमधील रहिवाशांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. पाण्याचा शॉवर आणि साउंड सिस्टिमद्वारे गीतांची रेलचेल होती. रंग उधळण आणि नृत्यावर थिरकत रंगपंचमीचा आनंद लुटला जात होता. या वेळी विश्वमोहन मालपानी, अजय उपाध्ये, पकंज जैन, हरीष लोया, शिवानंद रिक्के, देसाई, तोष्णीवाल आदींसह अनेकजण उपस्थित होते. यानंतर महेश गार्डनमध्ये महिला, पुरुषांनी कोरडी रंगपंचमी साजरी केली.