आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - ‘मला थांबवू नका, विमानाने जायचे आहे’ असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सांगत होते. परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर सपाटे गृहमंत्र्यांच्या गाडीसमोरून हलले नाहीत. तुमच्या हस्ते कार्यक्रम करायचा, असा हट्ट धरला. अखेर आग्रह न मोडता शिंदे यांना शिवाजी प्रशाला गाठावी लागली. अन् त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नको नको म्हणत शिंदे यांना अखेर कार्यक्रमास जावे लागलेच.
वेळ दुपारी दीडची, प्रभात चित्रपटगृहासमोरील शिवाजी प्रशाला व शिक्षण संकुलाच्या शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना मिरवणूक नुकतीच येऊन शाळेच्या प्रांगणात थांबलेली. शोभायात्रेत पायपीट करून दमलेले शिक्षक, प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी आणि संस्थेचे सदस्य शाळेच्या पटांगणात विसावा घेत होते. तर मनोहर सपाटे रस्त्याच्या दुभाजकावर उभारून पुतळा व्यवस्थित बसवण्याच्या टिप्स देत होते. शिंदे यांच्या हस्ते ही पूजा होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी गृहमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा सायरन वाजवत नवीवेस चौकीसमोर आला. सपाटे तडक सावध झाले आणि दुभाजकावरून उतरत रस्त्यावर आले. त्यांनी शिंदे यांच्या गाडीला हात करीत थांबवले. आत बसलेल्या शिंदेंना पूजा करण्यास उतरा, अशी विनंती केली. परंतु शिंदेंनी ‘नको, मला पुढे जायचे आहे’, असे सांगितले. सपाटेंनी ‘तुम्ही आलेच पाहिजे,’ असे म्हणत त्यांना गाडीतून उतरवले. प्रभात चित्रपटगृहासमारेच्या दुभाजकावरून कसरत करीत त्यांना छत्रपतींच्या मूर्तीसमोर नेले. आणि अवघ्या 10 मिनिटांत शिंदेंनीही त्यांचा मान राखीत परतीचा रस्ता धरला.
विद्यार्थ्यांमुळे आली शोभा
शिवमूर्तीच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मनापासून तयारी केल्याचे दिसून आले. मुलांनी पांढरा सदरा, भगवे फेटे तर मुलींनी विविधरंगी नऊवारी साड्या, नथ, गळ्यात चपलाहार, साजशृंगार केला होता. भगव्या पताका घेऊन आणि शिवरांयाचा जयजयकार करीत हा ताफा दिमाखात चालला होता. या शोभायात्रेत सपाटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शिवपूजेवेळी साहित्यिक विश्वास पाटील यांची उपस्थिती होती.
राजकीय वर्तुळात चर्चा
2009 मधील शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे महेश कोठे यांच्या विरोधात आघाडी धर्म न पाळता राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी निवडणूक लढवली होती. तसेच कोठे-सपाटे यांचा वाद सर्वांनाच परिचित आहे. सपाटे यांनी हट्ट धरून शिंदे यांना आपल्या कार्यक्रमाला नेले. यावरून राजकीय वतरुळात चर्चा रंगली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.