आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Shinde\'s Areaoplan In Air Due To Wrong Landing

चुकीच्या लँडिंगने गृहमंत्री शिंदेचे विमान हवेतच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोलापुरात घेऊन आलेले विमान चुकीच्या पद्धतीने उतरवल्यामुळे वैमानिकाला शहराला पाच घिरट्या घालण्याची शिक्षा मिळाली. अचानक ब्रेक दाबल्याने दोन्ही नेत्यांना एकमेकांचा धक्का बसला. विमानातून उतरल्यानंतर गृहमंत्री शिंदे यांनी वैमानिकाची कानउघाडणी करून त्याला विमान धावपट्टीवर उतरण्याचा सराव करण्याचा आदेश दिला. अचानक ब्रेक दाबणे वैमानिकाच्या अंगलट आले. शनिवारी सकाळी सोलापूर येथील होटगी रस्त्यालगतच्या विमान धावपट्टीवर हा प्रसंग घडला.


सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हे तुळजापूरला जाण्यासाठी खास विमानाने दिल्लीहून सोलापूरला आले. सव्वाअकरा वाजता हे विमान उतरत असताना त्याचा वेग ताशी दोनशेपेक्षा अधिक होता. धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याचा वेग कमी होण्यासाठी कारखान्याच्या दिशेने जाणे आवश्यक होते, पण वैमानिकाने तसे न करता थेट विमानाला ब्रेक लावून ते मुख्य स्थानकाकडे वळवले. परिणामी आत बसलेल्या शिंदे व चव्हाण यांना जोराचा धक्का बसला. धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. विमानातून उतरल्यानंतर शिंदे यांनी त्या वैमानिकाला शहराला पाच घिरट्या मारून लँडिंगचा सराव करण्याची शिक्षा दिली. घिरट्या मारून विमान मुंबईच्या दिशेने झेपावले.