आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minster Sushilkumar Shende Held Meetiing In Solapur

निमलष्करी दलांच्या जागेसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तीन निमलष्करी दलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सोलापुरात जागा शोधण्यात येत आहे. प्रत्येकी किमान शंभर एकर लागणार आहे. सीमा सुरक्षा दलासाठी हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) तर केंद्रीय राखीव पोलिस दलासाठी टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागेसाठी अनुकूलता आहे.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी सोमवारी बैठक घेतली. तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकारी, वनाधिकारी यांच्यासमवेत या विषयाचा आढावा घेण्यात आला. ‘बीएसएफ’साठी नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे जागा घेण्याचे प्रयत्न होते. ही मोकळी जागा वनविभागाची असून ती घेण्यासाठी प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे त्याचा विचार रद्द झाला आहे.

बैठकीस महापौर अलका राठोड, ‘सीआयएसएफ’चे महासंचालक राजीव, अपर महासंचालक कौशिक, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पुणे विभागाचे मुख्य वन संरक्षक जीतसिंग, तीनही तालुक्याचे तहसीलदार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बाजार समितीचे उपसभापती राजशेखर शिवदारे, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, पोलिस अधीक्षक राजेश प्रधान उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांनी दिली जागेविषयी माहिती
सीआयएसएफ जागा निश्चितीसाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बीएसएफ, सीआयएसएफ आणि एसआरपीएफ साठी संभाव्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील 40.65 हेक्टर, हन्नूर येथील 50 हेक्टर आणि मुस्ती येथील शंभर एकर खाजगी आणि 50 एकर शासकीय जमिनीबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी माहिती दिली.

ती जागा ‘सीआयएसएफ’साठी
हन्नूर येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे या जागेसाठी अनुकूलता नव्हती. मात्र, कुरनूर धरण व उजनीचे पाणी येथपर्यंत येऊ शकते, असा पर्याय पुढे आल्याने त्यास अनुकूलता मिळाली. मुस्तीजवळ पन्नास एकर जागेत पाझर तलाव आहे. येथील जागा जिल्हा परिषदेची आहे. जागेचा उतारा त्याच नावे ठेवून ती जागा ‘सीआयएसएफ’साठी देण्यात येणार आहे. एका दलाचे किमान दीड ते दोन हजार जवान, अधिकारी राहतील. अक्कलककोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन असे एकूण तीन पॅरामिलीटरी फोर्स येणार असल्यामुळे सोलापूरची सुरक्षा अधीक सक्षम होण्यास मदत होणार आहे.