आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीवर टॉवर लावताय? सभा बोलवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींवर मोबाइल टॉवर किंवा जाहिरातींचे फलक लावायचे असतील तर यापुढे संबंधित संस्थेची विशेष सभा बोलवावी लागेल. त्याला 70 टक्के सदस्यांनी उपस्थित राहून एकमताने ठराव केला तरच असे टॉवर अन् फलक इमारतींवर बसवण्यासाठी परवानगी मिळेल. याबाबत सहकार खात्याचे सचिव राजगोपाल देवरा यांनी एक नियमावलीच तयार केली. त्याचा अंमल संस्था नोंदणी उपनिबंधकांनी करायचा आहे.
संस्थांच्या इमारतींवर असे टॉवर अन् फलकांना ‘ना-हरकत’ देताना, काही संस्थांनी इतर सदस्यांना अंधारात ठेवल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे आल्या.
अशा विषयांना मंजुरी देण्यासाठी सभा बोलावल्या तरी त्याला सदस्यांची पुरेशी संख्या उपस्थित नाही, हेही निरीक्षणातून दिसून आले. त्यामुळे संस्थेतील काही सदस्यांना टॉवरचा त्रास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहकार खात्याने हे पाऊल उचलले. अशा विषयांसाठी सभा आवश्यक असल्याचे सांगतानाच, संबंधित कंपन्यांशी करार कसा करावा, उत्पन्नाचा विनियोग कसा असावा, याचेही निर्देश दिले आहेत.

असा करावा करार
इमारतींवर टॉवर अथवा जाहिरात फलक लावणार्‍या कंपन्यांनी दिलेला प्रस्ताव विशेष सभेत ठेवावा लागेल. त्याशिवाय त्यांचे वजन आणि इतर तांत्रिक माहितीही सदस्यांना द्यावी लागेल. 70 टक्के सदस्यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सभेचे चित्रीकरण (व्हिडीओ रेकॉर्डिंग) होईल. त्यानंतर झालेला ठराव इतिवृत्तात नोंदवावा. त्यानंतर संस्थेची इमारत प्रस्तावित टॉवर अथवा जाहिरात फलकासाठी सक्षम असल्याचा दाखला शासनमान्य अभियंत्याकडून (स्ट्रक्चरल इंजिनिअर) घ्यावा. त्यानंतरच संबंधित कंपन्यांशी करार करावा.