आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे उत्तम गृहमंत्री;पाटील प्रभावहीन, हुसेन दलवाई यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी उत्तमपणे गृहमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र, विद्यमान गृहमंत्री आर. आर. पाटील हे प्रभावीपणे काम करत नाहीत, अशी टीका कॉँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली.

पुण्यातील हल्ल्यात सोलापुरातील मोहसीन शेख याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्याकरिता दलवाई हे सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दलवाई म्हणाले, भाजप सत्तेवर आल्यावर काही संघटना महाराष्ट्रात तणाव निर्माण करीत आहेत. असे करण्यास मोदींनी सांगितलेले नसावे परंतु आमची सत्ता आली काहीही करा, असे विचार डोक्यात घेऊन असे प्रकार घडत आहेत. शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांचा खरा इतिहास लपवून ठेवला जात असून बनावट इतिहास लोकांसमोर मांडला जात आहे.

फेसबुक आणि व्हॉट्स अँप द्वारे महापुरुषांचा अवमान केला जात आहे. मोहसीन शेख या निरपराध तरुणाची हत्या करण्यात आली. हिंदू राष्ट्र समितीने हा प्रकार केला असून त्या संघटनेचा प्रमुख देसाईला अटक करावी, अशी मागणीही या वेळी हुसेन यांनी बोलताना केली.

शेख यांचा घरचा आहेर
‘सोलापुरात ज्या ठिकाणी दगडफेक आणि हाणामारीच्या घटना घडल्या त्या ठिकाणी कॉँग्रेसचे पदाधिकारी जाऊन शांततेचे आवाहन करीत आहेत’, असे खासदार हुसेन दलवाई पत्रकार परिषदेमध्ये बोलले. यावर आक्षेप घेत कॉँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी नई जिंदगी मध्ये तुफान दगडफेक झाली. तेथे कॉँग्रेसचे नेते आले नाहीत, अशी रोखठोक भूमिका घेत कॉँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला.