आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husain Dalwai News In Marathi, MP, Congress, Divya Marathi

मुंडे उत्तम गृहमंत्री; पाटील प्रभावहीन, हुसेन दलवाई यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी उत्तमपणे गृहमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र, विद्यमान गृहमंत्री आर. आर. पाटील हे प्रभावीपणे काम करत नाहीत, अशी टीका कॉँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली.
पुण्यातील हल्ल्यात सोलापुरातील मोहसीन शेखचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्याकरिता दलवाई सोलापुरात आले होते. भाजप सत्तेवर आल्यापासून काही संघटना महाराष्ट्रात तणाव निर्माण करीत आहेत. असे करण्यास मोदींनी सांगितलेले नसावे. परंतु आमची सत्ता आहे, काहीही करा असे विचार डोक्यात घेऊन असे प्रकार घडत आहेत. मोहसीन शेखच्या हत्येप्रकरणी हिंदू राष्ट्र संघटनेचा प्रमुख देसाईला अटक करावी, अशी मागणी दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
.. अन् दलवाई निरुत्तर
सोलापुरात झालेल्या दगडफेक प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यांनी असा प्रकार केला त्याला अटक करण्यात आली नाही. माजी पोलिस अधिकारी मुर्शीफ यांनी लिहिलेल्या ‘करकरेंचे मारेकरी कोण’ या पुस्तकावर तुम्ही काय भूमिका घेतली, पुण्यात मोहसीन शेखची हत्या झाली ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का, यातील एकाही प्रश्नाचे उत्तर हुसेन दलवाई देऊ शकले नाहीत.
शेख यांनी दिला घरचा आहेर
‘सोलापुरात ज्या ठिकाणी दगडफेक आणि हाणामारीच्या घटना घडल्या त्या ठिकाणी कॉँग्रेसचे पदाधिकारी जाऊन शांततेचे आवाहन करीत आहेत’, असे खासदार हुसेन दलवाई पत्रकार परिषदेत बोलले. याला कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी आक्षेप घेतला. नई जिंदगीमध्ये तुफान दगडफेक झाली. तेथे कॉँग्रेस नेते आले नाहीत, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.