आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरची हुतात्मा एक्स्प्रेस सोमवारी करतेय 14व्या वर्षांत पदार्पण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पाहता पाहता हुतात्मा एक्स्प्रेसने आपल्या सेवाकालावधीची तेरा वर्षे पूर्ण केली आहेत. किशोरवयीन रंगढंगात असलेल्या हुतात्माला सोलापूर-पुणे मार्गावरील प्रवाशांची पहिली पसंती कायमच राहिली आहे. पुण्याच्या भौगोलिक अंतरात काही फरक नसला तरी हुतात्मामुळे सोलापूरकरांसाठी पुणे केवळ साडेचार तासांच्या अंतरावर आले. वेळ आणि प्रवास खर्चातील बचत व शिक्षण आणि नोकरी निमित्ताने, पुण्याला जाणार्‍या तरुणाईचा लोंढाही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.

पूर्वी सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी एसटीने किमान साडेसहा ते सात तास लागायचे. सोलापूरहून पुण्याकडे जाणार्‍या मेल एक्स्प्रेस असल्या तरीही आरक्षित तिकिटांचा कोटा र्मयादित होता. शिवाय रेल्वेने प्रवासाचा वेळही पाच ते साडेपाच तासाचा होता. सोलापूरहून पुण्याला जाणारी स्वतंत्र्य रेल्वे असावी, अशी मनीषा सर्वसामान्य सोलापूरकर बाळगून होते. हुतात्मा एक्स्प्रेसच्या रूपाने हे स्वप्न पूर्ण झाले. 15 जुलै 2001 रोजी सोलापूरकरांची अस्मिता म्हणून हुतात्मा एक्स्प्रेस पुण्याकडे धावली. येत्या 15 जुलै 2013 रोजी हुतात्माला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हुतात्माच्या प्रवासातील हा धावता आढावा.

1 जुलै 2007 साली या गाडीला अतिरिक्त 1 डबा जोडण्यात आला. गाडी 13 डब्यांची झाली. 15 ऑगस्ट 2008 रोजी याला आणखी एक डबा जोडण्यात आला आणि ती 14 डब्यांची झाली. दरम्यानच्या काळात ही गाडी पुण्याला पोहोचल्यानंतर पुन्हा पुणे ते दौंड व दौंड ते पुणे धावायची. मात्र, या प्रवासात डबे खूप घाण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तो निर्णय रद्द केला. 2008 मध्ये रेल्वे विभागाने ही गाडी आणखी पुढे वाढविण्याचा निर्णय घेतला. पुण्यानंतर ही गाडी नाशिकच्या दिशेने धावू लागली. 1 जुलै 2012 रोजी ही गाडी आता पनवेलमार्गे भुसावळला जाऊ लागली आणि हुतात्मा 15 डब्यांची झाली. दरवर्षी या गाडीच्या प्रवाशांच्या संख्येत 5 ते 6 टक्क्यांनी भर पडत आहे. या तेरा वर्षांत हुतात्मा एक्सप्रेस या गाडीने 94 कोटींहून अधिक रेल्वेला उत्पन्न मिळवून दिले आहे.

कलमाडींकडून उद्घाटन
15 जुलै 2001 रोजी सकाळी सहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या हस्ते गाडीचे उद्घाटन झाले. या वेळी सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिरवा झेंडा पाहताच धावणारी ही रेल्वे अनेक सोलापूरकरांच्या आशा, अपेक्षा, स्वप्ने घेऊन निरंतर धावत आहे. कुणी शिक्षणासाठी तर नोकरीसाठी, तर कुणी स्थायिक होण्यासाठी पुण्याला जातात. या सर्वांना वेळेवर पुण्याला सोडण्यासाठी झुक झुक करीत धावणारी हुतात्मा अनेक कडू-गोड आठवणींची जणू शिदोरी बनली आहे. 71 लाखांहून अधिक प्रवाशांना हुतात्माने पुण्याला पोहोचवले.

होती 12 डब्यांची
सुरुवातीला हुतात्मा 12 डब्यांची होती. 2157 हा क्रमांक पुण्याला जाणार्‍या गाडीचा होता. 2158 हा क्रमांक सोलापूरला येणार्‍या गाडीचा होता. सोलापूरहून सकाळी सहा वाजता ती पुण्याला प्रस्थान करायची आणि पुण्याला सकाळी 10 वाजता पोहोचायची. तीच गाडी सायंकाळी सहा वाजता पुण्याहून सोलापूरला निघायची. यात कुडरुवाडी व दौंड या स्थानकावर ती थांबायची. सकाळी सहाची वेळ अनेकांना गैरसोयीची ठरत असल्याने गाडीची वेळ बदलण्यासाठी सोलापूरकरांनी आग्रह धरला. त्यानंतर गाडीची वेळ बदलून सहाऐवजी साडेसहा झाली.

हुतात्मा एक्स्प्रेस वाढदिवस प्रवासी संघाच्या वतीने मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. 15 जुलै रोजी सोलापूर स्थानकावर प्रवाशांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. संजय पाटील, उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ