आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Oppose To Give Gurden Land For The BOT, Indicat The Praniti Shinde

उद्यानाची जागा बीओटी तत्त्वावर देण्यास माझा विरोध, प्रणिती शिंदे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पूर्व भागातील श्री मार्कंडेय उद्यानाची पन्नास टक्के जागा बीओटी तत्त्वावर देण्याच्या विषयावर आता कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. उद्यानाची जागा बीओटी तत्त्वावर देण्याला माझा विरोध असून कोणालाही जागा घेऊ देणार नाही, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मंगळवारी दिला. उद्यान बचावासाठी आमदार प्रणिती शिंदे पुढे सरसावल्यामुळे बीओटीचा प्रस्ताव सादर करणार्‍या कोठे गटाची पंचाईत झाली आहे.

श्री मार्कंडेय उद्यानाची पन्नास टक्के जागा श्रवंती मंडप डेकोरेटर संस्थेस बीओटी तत्त्वावर देऊन उर्वरित पन्नास टक्के उद्यान सुशोभीत करण्याच्या विषयाला गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने मंजुरी देण्यात आली. नगरसेवक चेतन नरोटे आणि दत्तू बंदपट्टे यांनी हा विषय सादर केला होता. हे दोन्ही नगरसेवक कोठे गटाचेच समजले जातात. श्रवंती ही संस्था सुद्धा कोठे यांच्या कार्यकर्त्याचीच असल्याचे दिव्य मराठीने पुढे आणले.

राजकीय चर्चेला उधाण, विषय मंजुरीवर प्रश्नचिन्ह
महापालिकेतील आतापर्यंतचा इतिहास पाहता कोठे सर्मथकांनी स्थायी समितीत मांडलेल्या विषयाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे कधीच झाले नाही. सभागृहनेते महेश कोठे यांनी या विषयाचे सर्मथन केले आहे. मार्कंडेय उद्यानाची पन्नास टक्के जागा नियमानुसारच द्या. यापूर्वी उद्यानाच्या जागा याच तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. मग, याला आताच का विरोध करता, जर उद्यानाची जागा द्यायची नसेल तर कोणालाच देऊ नका, असे मत महेश कोठे यांनी व्यक्त केले आहे. यानंतर आता आमदार शिंदे यांनी मार्कंडेय उद्यानाची जागा कोणालाच घेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे या विषयाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे व कोठे यांचे राजकारणातील ‘सख्य’ पाहता विरोध व सर्मथनामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.


विकास समोर ठेवून निर्णय
शहरातील उद्यानाचा विकास व्हावा अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे विकास डोळ्यासमोर ठेवून बागा देण्याचा निर्णय घ्यावा. उद्यानाची विकास झाला पाहिजे. ठराविक व्यक्तीलाच दिला पाहिजे असे मत नाही. महापालिकेने विकासासाठी निर्णय घ्यावा. महेश कोठे, मनपा सभागृह नेता


बागांचे अस्तित्व संपेल
बीओटीमुळे उद्यानाचे अस्तित्व संपून जाईल. पन्नास टक्के जागेवर खुले लॉन केल्यामुळे पुढच्या काळात उद्यानावर अतिक्रमणाचा विळखा पडण्याचा धोका आहे. त्यासाठी उद्यानाची जागा कोणालाच देऊ नये. उद्यानाची जागा इतर कारणासाठी देण्याला माझा विरोध आहे. प्रणिती शिंदे, आमदार