आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बेकायदा डिजिटल फलक कारवाई हवेतच विरली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी वाहतूक शाखेचे नवे साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी सरी बरसाव्यात अशा घोषणांवर घोषणा केल्या. नव्याचे नऊ दिवस या पध्दतीने कामाला सुरुवात केली. पण परिणामांचा दुष्काळच दिसून येत आहे. पोलिस यंत्रणा तेवढय़ा सक्षमपणे काम करताना दिसत नाही. शहरातील डिजिटल फलकांवर कारवाईचे पोलिस आयुक्तालयाने फर्मान सोडले पण कारवाईला थंडा प्रतिसाद आहे.

वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात आत्राम, निरीक्षक वाय. बी. शिर्के यांनी वारेमाप घोषणा केल्या. पण अंमलबजावणी तेवढय़ा गंभीरतेने होताना दिसत नाही. किरकोळ अतिक्रमण काढण्याखेरीज यंत्रणेला काहीही गवसले नाही. यासंदर्भात शिर्के म्हणतात, दररोज संध्याकाळी व सकाळी महत्त्वाच्या चौकात अतिक्रमण काढणे, नाकाबंदी लावणे, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई मोहिमेत मनुष्यबळ खर्ची पडत आहे. ‘‘सिग्नल नियमित चालू ठेवण्यासाठी आणि दंडात्मक समन्सबाबत अधिकार्‍यांना पुन्हा सूचना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या आश्वासनाचे कृती रूपांतर होईल काय हा खरा प्रश्न आहे.


परवानगीसाठी थंडा प्रतिसाद
शहरात डिजिटल फलक लावताना पोलिस, महापालिका विभागाची परवागनी घेतल्याशिवाय फलक लावू नये असे फर्मान मागील आठवड्यात पोलिस आयुक्तालयातर्फे काढण्यात आले. त्याला थंडा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत फक्त सहाजणांनी वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याची माहिती बुधवारी मिळाली. शहरातील डिजिटलची संख्या शेकड्यात आहे. विशेष म्हणजे परवानगी घेतली की नाही, हे फलकावरून समजतच नाही. नो डिजिटल झोन संकल्पना तर कागदावरच आहे.


सिग्नल अद्याप बंदच
दहा सिग्नलपैकी तीनच चौकांतील सिग्नल बुधवारी चालू होते. आसरा, गांधीनगर, रंगभवन, सिव्हिल चौक, आम्रपाली, संत तुकाराम चौक, शांती चौक येथील सिग्नल बंद होते. डफरीन, सरस्वती व जुना होटगी नाका हे तीनच सिग्नल चालू होते. सिग्नल तांत्रिकदृष्ट्या बंद असतील तर हातवारे करून (मॅन्युअलव्दारे) वाहतूक नियंत्रित करावी, असे आदेश असताना पोलिस पाळत नसल्याचे चित्र आहे.


पोलिस ठाण्यानुसार बैठका
डिजिटल फलक लावण्यासाठी सातही पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून याबाबत माहिती देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या आवाहनानुसार झोन विभाग, वाहतूक पोलिस यांच्याकडे परवानगी घेण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. संवादाच्या माध्यमातून यावर उपाययोजना सुरू आहे. सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त