सोलापूर- आसरा चौक परिसरातील एस्सार पेट्रोल पंपासमोरील कॉम्प्लेक्समधील गाळ्यात मटका जुगाराची मुख्य बुकी चालवली जात होती. भरचौकात असणार्या या मटका बुकीकडे पोलिसांची नजर कशी वळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र ‘दिव्य मराठी’ने बुधवारी दुपारी येथील फोटो काढताच पोलिसांनी संध्याकाळी येथे कारवाई केली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच अवैध व्यवसायांवर नियंत्रणाचे आदेश दिलेले असताना पोलिसांकडून मटका हद्दपार केला जात नाही.
आसरा चौकात हे मोठे कॉम्प्लेक्स आहे. अल्फा हॉटेलच्या बाजूला एक गाळ्याला हिरव्या रंगाचा पडदा लावलेला असतो. पडद्याच्या आतमध्ये साधारण सात ते आठजण हिशोब करत बसलेले असतात, तर एकजण मटक्याचे आकडे घेत असतो. कोणत्या तरी बुकीचे हे कार्यालय असल्यामुळे येथे नेहमीच सात-आठजण चिठय़ांचा हिशोब करत बसलेले असतात. एका व्यक्तीकडे दोन-तीन मोबाइल असतात. वर्दळीच्या आवारात मटक्याचा जुगार बिनबोभाट सुरू होता.
एकाच बुकीवर कारवाई
संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहर गुन्हे शाखेच्या वतीने मटका बुकींवर धाड टाकण्यात आली. मल्लिकार्जुन लिंगप्पा बिराजदार व प्रशांत राजेंद्र झुंजारराव या दोघांना अटक करून त्यांच्याकडील तेरा हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आले. '
बुकीवर कारवाई मंद
किरकोळ मटका टपर्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु मटका बुकीवर कारवाई करण्यात येत नाही. मध्यंतरी ‘दिव्य मराठी’ने मटका बुकींच्या सर्व अड्डय़ांचे पत्ते प्रसिद्ध केले होते. परंतु तेथे पोलिस फिरकलेही नाहीत. मुख्य मटका बुकीवर कारवाई झाली तरच मटक्यांवर नियंत्रण मिळविता येईल. परंतु पोलिस फक्त कारवाईची औपचारिकताच करीत असल्याचे दिसून येते.
बसथांब्यामागे कोणाचे बळ
आसरा चौक परिसरातील गणेश बिल्डर्सच्या बाजूला बस स्टॉप आहे. या बस स्टॉपच्या मागे बारदाने आणि प्लास्टिकचे शेडमध्ये मटका जुगार रस्त्याकडेलाच चालतो. ‘दिव्य मराठी’ने फोटोसह वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलिसांना मात्र ही मंडळी जुमानत नाही. बसस्थानकामागेच अवैध व्यवसाय चालत असल्याने महिला थांब्यावर थांबण्यापेक्षा चौकात थांबतात. बसस्थानकाचा आडोसा घेऊन रस्त्याकडेला पथारी टाकून मटका जुगार खुलेआम चालतो आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोलापुरातील मटक्याची बोलकी छायाचित्रे...