आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Issue In Railway Boigie On Solapur Railway

अवैध प्रकारासाठी रेल्वे डब्यांचा होतोय वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वेस्थानकावर एकूण पाच फलाट आहेत. यात सर्वात शेवटी असलेल्या फलाट क्रमांक पाच हा गेल्या काही दिवसांपासून गैरकृत्ये वाढली आहेत. रेल्वे पोलिसांचा धाक नसल्याने येथे अवैध प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. या फलाटावर मिळणारा सहज प्रवेश तसेच कुणाचीही भीती नसल्याने येथील अवैध प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गंभीर घटना घडण्यापूर्वी अशा प्रकाराविरुद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे,तरचअसले प्रकार तत्काळ रोखण्याबाबत पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

असे घडतात गैरप्रकार
सोलापूर -पुणे पॅसेंजर ही दररोज रात्री 11 वाजता सोलापूर स्थानकावरून सुटते. परंतु, रेल्वे यार्डात जागा नसल्याने ही गाडी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी फलाट क्रमांक 5 वर आणून लावण्यात येते. तब्बल 7 तास 20 मिनिटे ही गाडी या फलाटावर उभी असते. फलाटावर गाडी येताच गाडीचे पाठीमागील केवळ चार डबे बंद असतात. तर उरलेले 10 डब्यांचे दरवाजे उघडेच असतात. त्यातून काही लोक डब्यात प्रवेश करतात. डब्यात येण्यापूर्वीच या जोडप्यातील तो किंवा ती फलाटावर उभे असतात. योग्य डबा शोधून डब्यात प्रवेश मिळवला जातो. तो डब्यात चढल्यानंतर तिलाही डब्यात बोलावून घेतो. दोघेही डब्यात गेल्यानंतर दरवाजा आतून बंद करण्यात येतो. काही वेळानंतर दोघेही बाहेर येऊन आपापल्या मार्गी जातात. हा प्रकार आता नित्याचाच भाग बनत आहे.

बंदोबस्त वाढवावा
रेल्वेस्थानकावर सहज मिळणार्‍या प्रवेशामुळे असले प्रकार वाढत आहेत. रेल्वे प्रशासनाने तिकीट निरीक्षक तसेच रेल्वे पोलिसांचा कायम बंदोबस्त ठेवल्यास अशा प्रकारांना पायबंद बसू शकेल.

..याची माहिती नाही
सोलापूर रेल्वेस्थानकावर घडणार्‍या या प्रकाराबद्दल मला माहिती नाही. सध्या मी नाशिक येथे असून सोलापुरात आल्यानंतर माहिती घेऊन बोलतो. -कृष्णाकांत शर्मा, रेल्वे सुरक्षा आयुक्त, सोलापूर विभाग

लवकरच कारवाई
रेल्वेस्थानकावर चालणारा प्रकार हा धक्कादायक आहे. या संदर्भात लवकरच रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.
-सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक.

स्थानकावर विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई
रेल्वेस्थानकांवरील फलाट पाचवर गाड्यांची रहदारी खूपच कमी आहे. त्यामुळे फलाटावर महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांचा वावर दिसून येतो. रेल्वेस्थानकावरील पाच क्रमांकाच्या फलाटावर असणारी शांतता अवैध प्रकार करणार्‍यांना खुणावते. कुणीच विचारणार नसल्याने यांचे धाडस वाढत आहे. कॉलेज व क्लासेस संपल्यानंतर कॉलेजच्याच गणवेशात ही मुले फलाटावर दाखल होतात. प्रवासी असल्याच्या थाटात रिकाम्या डब्यात बसून गैरकृत्य करतात.

पॅसेंजरच्या डब्यांचे दरवाजे बंद असावेत
गाडी फलाटावर लवकर आणून उभी करण्यात आली तरी गाडी मार्गस्थ होण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी साधारण एक तासअगोदर रेल्वे डब्यांचे दरवाजे उघडले जावेत, असे रेल्वेचे नियम आहेत. यार्डातून गाडी निघाल्यानंतर गाडीतील सर्व डब्यांचे दरवाजे बंदिस्त असणे गरजेचे आहे. मात्र, गाडी रेल्वे स्थानकावर येताच डबे उघडे केले जात असल्याने असे प्रकार घडतात. त्यामुळे गाडी निघण्यापूर्वी एक तास अगोदर डब्यांचे दरवाजे उघडले पाहिजेत.

अशा प्रकारे केला जातो रेल्वे डब्यांचा गैरवापर
रेल्वेस्थानकावर पोलिस व तिकीट निरीक्षकांचे लक्ष नसल्याने या युगुलांना थेट प्रवेश करता येतो. त्यामुळे रिकाम टेकाड्या लोंकाची येथे गर्दी असते. अशा लोंकावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वेस्थानकावर अवैधरीत्या फिरणार्‍यावर व बसणार्‍यावर कसलीही कारवाई केली जात नाही. कुणाचीही भीती नसल्याने रेल्वे डब्यांचा गैरवापर केला जात आहे. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल.

पॅसेंजरच्या डब्यात चालतात गैरप्रकार
सोलापूर रेल्वेस्थानकावरून रात्री सुटणार्‍या सोलापूर-पुणे पॅसेंजरमध्ये अवैध प्रकार मोठय़ा प्रमाणात चालतात. त्यानंतर सकाळी पुण्याहून सोलापुरात येणार्‍या गाडीतही असा प्रकार चालतो. ही गाडीदेखील सकाळी पाच ते सहा तास फलाट पाचवर उभी असते. याशिवाय सोलापूर-यशवंतपूर गोलघुमट एक्स्प्रेसमध्ये असा प्रकार होतो. ही गाडीही दुपारी दोन ते अडीच तास फलाटावर उभी असते.

..तर गुलबग्र्याची पुनरावृत्ती सोलापुरात घडेल
काही महिन्यांपूर्वी गुलबर्गा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या गाडीत लागलेल्या आगीत प्रेमीयुगुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वर्षा व शरणू अशी मृतांची नावे होती. हे प्रेमीयुगूल गुलबर्गा रेल्वेस्थानकावरील फलाट तीनवर रोज उभ्या असलेल्या पॅसेंजरच्या डब्यात बसायचे आणि एके दिवशी रेल्वे डब्यास आग लावून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा तपास सध्या सुरू आहे. सोलापूर रेल्वेस्थानकावरही असाच प्रकार सुरू आहे. भविष्यात होणारी मोठी घटना टाळण्यासाठी वेळीच या प्रकारांना रोखणे आवश्यक आहे.

अनधिकृत विक्रेते, तृतीयपंथीयांचा वावर
सोलापूर रेल्वेस्थानकावर अनधिकृत विक्रेते व तृतीयपंथीयांचा वावर वाढला आहे. तृतीयपंथीय हे सायंकाळी सात ते आठच्या सुमारास रामवाडीच्या बाजूने फलाटावर दाखल होतात. फलाटावर फेरफटका मारल्यासारखे करतात. फलाट पाचवर उभ्या असलेल्या डब्यात बसून गैरकृत्ये करतात. याशिवाय अनधिकृ त विक्रेत्यांची संख्याही वाढत असल्याने अवैध प्रकार वाढले आहेत.