आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Lender Possession In The Department Of Cooperation

जमिनी हडप करणारे बडे सावकार जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लिंबी चिंचोळी(ता. दक्षिण साेलापूर) येथे बेकायदा सावकारी करणारा एक ‘मोठा मासा’ सहकार खात्याच्या जाळ्यात आला. शनिवारी त्याच्या घरी मारलेल्या छाप्यात कोटीपेक्षा अधिक रकमेचे ५९ व्यक्तींचे खरेदीखत, १०० पेक्षा जास्त कर्जदारांचे साठेखत, कोरे धनादेश आणि सह्या असलेले कोरे मुद्रांक मिळाले. या शिवाय ७४ व्यक्तींच्या नावाचे सात-बारा उतारेही मिळाले आहेत. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व कागदपत्रे जप्त केली. बेकायदा सावकारीच्या विरोधातील सहकार खात्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
शिवप्पा ऊर्फ शिवानंद चंद्रशेखर होटगे आणि त्यांचे वडील चंद्रशेखर शिवाप्पा होटगे अशी या बड्या सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अंबिका लक्ष्मण भरमशेट्टी (अक्कलकोट) यांनी तक्रार केली होती. दक्षिणचे सहायक निबंधक कटकदौंड यांच्या नेतृत्वाखालील पथकात एम. पी. राऊत, व्ही. एस. नाकेदार, एम. एस. बदोले, ए. ए. कुलकर्णी, पोलिस कॉन्स्टेबल पंडित चव्हाण, आडगळे आदी होते.
पहिल्यांदाच गुन्हा नोंद
होटगे पिता-पुत्रांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम ३९, ४१ (ग) मधील तरतुदीनुसार वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सुधारित कायद्याप्रमाणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. कोटीपेक्षा अधिक रकमांची देवाण-घेवाण झाल्याने या सावकारांना जिल्हा न्यायालयात जामीन मिळू शकत नाही. उच्च न्यायालयातच जावे लागेल.
शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परत मिळतील
- जे शेतकरी होटगे यांच्याकडे जमिनी ठेवून कर्जबाजारी झाले. त्यानंतर या जमिनी होटगे यांच्या मालकीच्या झाल्या, अशा सर्व जमिनी पुन्हा संबंधित शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न राहतील. शहर अथवा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणी बेकायदा सावकारी करत असतील, तर त्यांच्या विरोधात तक्रारी द्या. गोपनीयरीत्या छापे टाकून संबंधितांवर कारवाई करू.
बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक
जमिनी हडप केल्या
- सात-बाराउतारे, करारनामे, सह्या अंगठे असलेले कोरे बाँड, कोरे धनादेश आदींची पाहणी करता, संबंधितांना कर्जे दिली. बेकायदेशीर व्याजाची आकारणी केली. त्यानंतर या जमिनी आणि प्लॉट हडपल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आलेले आहे. छाप्यात काही आक्षेपार्ह डायऱ्या, शालेय वह्या, रजिस्टरही आढळून आल्या, ज्यात बेकायदा सावकारीच्या नोंदी दिसतात.
बी. एस. कटकदौंड, सहायकनिबंधक, दक्षिण सोलापूर