आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत होतेय अनधिकृत‘खानपान’सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वेने अधिकृत अन्न पुरवठादार नियुक्त केले आहेत. परंतु त्याला फाटा देत काही अनधिकृत पुरवठादारांचा शिरकाव झाला आहे. रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेला छेद देत अनधिकृत अन्न पुरवठादारांचा सुळसुळाट झाला आहे. सोलापुरातही अशा प्रकारची खानपानसेवा गुपचूप कार्यरत आहे. त्याचा शोध घेण्यात रेल्वे यंत्रणेला यश आलेले नाही.

सोलापूर रेल्वे स्थानकावर सुरक्षितता तर नाहीच पण कोणीही प्लॅटफार्मवर येऊन परवाना नसतानाही व्यवसाय करीत असल्याचे दिसते. तसेच रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस वाढणार्‍या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. आता तर सोलापुरातील काही मंडळी थेट रेल्वेत अनधिकृत मार्गाने अन्नपुरवठा करू लागली आहे. घरबसल्या चांगली कमाई होत असल्याने अनेकांचा ओढा याकडे वळला आहे. दर दोन दिवसांआड 100 ते 400 डबे स्थानकावर येऊन वेगवेगळ्या रेल्वे गाड्यात देण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासन या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अधिकृत परवाना आवश्यक
रेल्वे नियमानुसार प्रवाशांनी पॅन्ट्रीकार व रेल्वेचे अधिकृत अन्न पुरवठादारांकडून जेवण घेणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासला जात असून रेल्वे प्रशासनही तपासणी करीत नसल्याने हा प्रकार वाढला आहे. रेल्वे स्थानकावर बाहेरचे पदार्थ विक्री करण्यास मज्जाव आहे. रेल्वे नियमांचे उल्लंघन करीत पॅन्ट्रीकार नसलेल्या गाड्यांना मोठय़ा प्रमाणात सोलापूर स्थानकावरून डबे पुरवण्यात येत आहेत. हे डबे कोणाचे आहेत, कोणासाठी देण्यात येतात, यातून कोणता अनुचित प्रकार घडला तर काय, असे प्रश्‍न निर्माण होत असताना रेल्वे प्रशासन गप्पच असल्याचे दिसते.