आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Sand Soil Degging In The Protection On Administration

अवैध मुरूम उपसाला प्रशासनाचे अभय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर - तालुक्यातील कोंडी येथील शेतकर्‍यांनी बेकायदा मुरूम उपसा करणारी दोन पोकलेन व 12 वाहने पकडून मंडल अधिकार्‍यांच्या ताब्यात दिली. मात्र, त्यांनी कारवाई न करता ती सोडून दिली. गेल्या आठ महिन्यांपासून माळढोक अभयारण्य क्षेत्रात अवैधरीत्या मुरूम उपसा सुरू असताना आणि ते रंगेहाथ सापडले असतानाही जाणीवपूर्वक कारवाई टाळण्यात आल्याने महसूल खात्याच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या या बेकायदा मुरूम उत्खननप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याने हे प्रकरण आणखी संशयास्पद ठरत आहे.

सोमवारी रात्री कोंडी येथील शेतकर्‍यांनी तेथे मुरूमाचा उपसा करणारी पोकलेन व वाहने पकडली. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना कळविले असता त्यांनी चौकशीसाठी मंडल अधिकारी व तलाठय़ांना पाठविले. शेतकर्‍यांनी मुरूम उपसा करणारी यंत्रे व वाहने त्यांच्या ताब्यात दिली. परंतु ती जप्त करून कारवाई न करता सोडून देण्यात आली. मंगळवारी यातील शेतकर्‍यांना गळाला लावून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेतकर्‍यांनी भीक न घातल्याने तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद देण्याचे आदेश तलाठय़ांना देण्यात आले. त्यांनी दिलेली तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला कोट्यवधी रुपये किमतीचा बेकायदा मुरूम उपसा, वन्यजीव कायद्याचा भंग यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. तसेच वरिष्ठांच्या आदेशाशिवाय गुन्हा दाखल करणार नसल्याची भूमिका पोलिस निरीक्षकांनी घेतल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
वाहने पकडून दिली होती
आमच्या वतनी जमिनीत मुरूम उपसा सुरू होता. आम्ही यंत्रे व वाहने पकडून दिली. मंडल अधिकारी व तलाठी ती वाहने घेऊन गेले. पुढे प्रशासनाने ती वाहने सोडून दिल्याचे आम्हाला नंतर माहित झाले.’’ महादेव बोराडे, शेतकरी, कोंडी
तलाठय़ांना आदेश
बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी अनेकदा कारवाई करण्याविषयी तलाठय़ांना कळविले आहे. आता पुन्हा याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.’’ अंजली मरोड, तहसलीदार, उत्तर सोलापूर
अंधाराचा घेतला फायदा
अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक वाहने घेऊन पळून गेले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसे निर्देश तलाठय़ांना दिले आहेत.’’ प्रवीण घम, मंडल अधिकारी, बाळे मंडल
वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार
कोट्यवधी रुपये किमतीचा मुरूम उपसा झाला आहे. याप्रकरणी महसूल खात्याने कारवाई केली नाही. आता फिर्याद दिली जात असल्याने हे प्रकरण संशयास्पद आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हा दाखल केला जाईल.’’ दत्तात्रय सोनवणे, पोलिस निरीक्षक, सोलापूर तालुका
अडीच लाख ब्रासचा उपसा
कोंडीत दोन लाख 50 हजार ब्रासचा मुरूम उपसा झाल्याचा अहवाल महसूल खात्याने दिला आहे. याची दंडासहित किंमत सुमारे 14 कोटी 50 लाख होते. तालुक्यात अन्यत्रही अभयारण्य क्षेत्रात मुरूम उपसा सुरू आहे. अंदाजे 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रातून सुमारे पाच लाख ब्रास मुरूम उत्खनन झाले आहे. याची दंडासहित किंमत 29 कोटी रुपये होईल.