आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त केलेले अवैध वाळू वाहतुकीचे ८० ट्रक पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा - खातगाव येथे ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी महसूल खात्याने ताब्यात घेतलेल्या २०८ ट्रकपैकी ८० ट्रक बुधवारी (दि. २४) रात्री अंधाराचा फायदा घेऊन चालकांनी पळवून नेल्या. दंडात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच महसूल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ट्रक पळवल्याने गेले तीन िदवसांपासूनच्या कारवाईवर पाणी फेरले गेले. याप्रकरणी सर्व ८० वाहन मालकांवर करमाळा पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सायंकाळपर्यंत ३५ ट्रक मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची तहसीलदार संजय पवार यांनी माहिती दिली.

रविवारी (दि. २१) खातगाव येथील नदीपात्रातून मर्यादेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या २०८ ट्रकवर प्रांताधिकारी तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली.याप्रकरणीमहसूल आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्या ट्रक मालकांना पाच कोटी ९९ लाखांचा दंड ठोठावला. दंड वसुलीची कारवाई सुरू असतानाच नदीपात्रात लावलेले महसूल प्रशासनाच्या ताब्यातील ८० ट्रक पळवण्यात आले. विशेष म्हणजे ट्रकवर देखरेखीसाठी नदीपात्रात एक मंडल अधिकारी आणि कोतवालासह १० पोलिसांचे पथक तैनात होते. यात एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश होता. तरीही ट्रक पळवण्यात आले.

याला पोलिस जबाबदार नाहीत
नदीपात्रात ट्रकवर देखरेखीसाठी नेमलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त दिला आहे. ट्रक पळवून नेण्यात आले याला पोलिस जबाबदार नाहीत. ती महसूल खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न नाही.
बिपीन हसबनीस, पोलिस निरीक्षक, करमाळा

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
कारवाईची प्रक्रिया सुरू असताना ८० ट्रक पळवून नेल्या जातात, हे गंभीर आहे. यावरुन महसूल खात्याच्या कामकाजाविषयी शंका येते. कारवाई जलद केली असतील तर ते पळून गेले नसते. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. विशाल घोलप, नागरिक, करमाळा

त्यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करतील
पळवण्यात आलेल्या ८० ट्रकच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ट्रकमालकांची गय केली जाणार नाही. जे ट्रक मालक दंड भरणार नाहीत त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाईल. ट्रकवर देखरेखीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करतील. संजयपवार, तहसीलदार, करमाळा
बातम्या आणखी आहेत...