आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पकतेने फुलवला गच्चीवर भाजीचा मळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुष्काळात शेती हा संकटाचा व्यवसाय ठरतो आहे. अशा परिस्थितीत नवअंकुर फुलविण्याचा ध्यास घेणार्‍या सेवानिवृत्त अधिकार्‍याने स्वत:च्या घराच्या गच्चीवर भाजीपाल्याचा जणू मळाच फुलविला आहे.

जगदीश नाईक हे पुणे जिल्हा परिषदेतून चीफ अकौंटंट फायनान्स ऑफिसर या पदावरून 13 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर भाजीपाल्याचा छोटेखानी मळाच फुलविला आहे. र्शी. नाईक यांनी आपल्या घराच्या गच्चीवर 7 बाय 3.5 फुटाचे वाफे तयार केले आहेत. गच्चीच्या पृष्ठभागावर प्लास्टिक अंथरून चारही बाजूंनी विटांचे तीन थर रचले आहेत. अशा पद्धतीने केलेल्या खड्डय़ात माती भरून 16 वाफे तयार केले आहेत. या वाफ्यांमध्ये वर्षभरात आलटून -पालटून पालेभाज्या लावतात. वांगी, मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, चुका, टोमॅटो अशा पालेभाज्या ते घेतात. रोज घरात लागणार्‍या भाज्यांची निर्मिती ते अशा पद्धतीतून हौस आणि र्शमाचा संयोग साधून करतात. घराच्या आवारात दहा वेगवेगळ्या फळांची झाडे लावली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात सावली व गारवा मिळतो. झाडांचा पडलेला पाला पाचोळा व घरातील रोजचा कचरा कुजवून त्यांचा या भाज्यासाठी खत म्हणून वापर करतात.

घरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करीत भाज्या व अंगणातील फळांची झाडे त्यांनी जोपासली आहेत. अंघोळीचे, स्वयंपाक, वॉश बेसिन व धुतलेल्या भांड्याचे सांडपाणी वाया न घालवता त्याचा वापर ते करतात. त्यांनी पाण्यासोबतच ऊर्जा बचतीसाठी सौर ऊर्जेचा उपयोग केला आहे.