आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरमध्ये दिल्लीत ‘जनसंसद’ घेणार : आण्‍णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जनतेने जनतेसाठी लोकसहभागातून चालवलेले राज्य म्हणजेच जनतंत्र होय. देशाची संसद व राज्याची विधानसभा यापेक्षाही ‘जनसंसद’ मोठी आहे. येत्या पाच महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये दिल्लीत ‘जनसंसद’ भरवली जाणार आहे. जनमत विचारात घेऊन भविष्यातील आंदोलनाची दिश ठरवली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोलापूर येथे दिली.
शैक्षणिक गुरुकुलाच्या उद्घाटनासाठी ते गुरुवारी सोलापूर मुक्कामी आले होते. या वेळी दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी ते विस्ताराने बोलत होते. अण्णा म्हणाले की, 30 एप्रिलपासून संपूर्ण देशभरात जनजागृतीसाठी जनतंत्र यात्रा सुरू करीत आहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमधील दौ-यास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मध्यरात्रीही लोक रस्त्यावर उभारून यात्रेचे स्वागत करीत आहेत.
व्यवस्था परिवर्तनाचा लढा
जनलोकपाल, राइट टू रिजेक्ट, दफ्तर दिरंगाई, भ्रष्टाचार आदी विषय तर लढ्याचे केंद्रबिंदू आहेतच. खरा प्रयत्न संपूर्ण व्यवस्थेमध्येच परिवर्तन आणण्याचा आहे. राजकीय पक्ष आणि प्रशासनातील अधिका-यांचे देशात तंत्र सुरू आहे. संसद व विधानसभेत खासदार व आमदारांना जनताच पाठवते. लोकांच्या अज्ञानाचा लाभ उठवत राजकारणी व अधिका-यांनी सत्तेवर कब्जा केला आहे, असे सांगून अण्णा हजारे यांनी परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले .
राज्यातील दुष्काळ सरकारनिर्मित
राज्यातील काही भागांत सध्या पडलेला तीव्र दुष्काळ हा सरकारनिर्मित आहे. भ्रष्टाचार व घोटाळ्यांनी पोखरलेल्या व्यवस्थेमुळे जनतेला दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगताना अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुष्काळ व उजनी धरणातील पाण्यासंदर्भात काढलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
घटनेतील पान अन् पान समतेसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समता व समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी राज्य घटनेतील पाना-पानावर तरतूद केली. परंतु देश चालवणा-यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. सत्ताधा-यांनी जनहितापेक्षा पक्ष व स्वहिताला महत्त्व दिले. राजकीय पक्ष सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा ऐकमेव अजेंडा राबवत आहेत. भ्रष्ट व व्याभिचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मतदारांनी खड्यासारखे बाजूला ठेवावे.