आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

73 व्या वर्षी घेतली एलएल.बी.ची पदवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आयुष्याच्या सत्तरीत मस्तपैकी निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आनंद घेणे आणि नातवंडांत रमणे हा ठरावीक पायंडा ज्येष्ठ नागरिकांत पडलेला असतो. परंतु, यास कलाटणी देऊन वयाच्या 73 व्या वर्षी सोलापुरातील रेवणसिद्ध गडमिरे यांनी कायद्याची पदवी घेत तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केलेला आहे. तसेच शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, असा संदेशही दिला आहे.

तुळजापूर वेस परिसरात राहणारे गडमिरे यांचे आयुष्यच नाट्यमय आहे. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1943 चा. 1965 ला दयानंद महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आॅनर्स ही पदवी घेतली. 1967 ला एमए, तर 1974 मध्ये बीएडही केले. यादरम्यान 1965 मध्ये शिवशाही येथे सेल्स् करस्पॉडंट म्हणून कामाला लागले. त्यानंतर लगेच 1966 मध्ये रेशन आॅफिस निरीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरीची शोधाशोध सुरू असतानाच गडमिरे यांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. 1970 मध्ये स्वत:चे एक प्लास्टिक वस्तूंचे युनिट थाटले. परंतु या व्यवसायात आलेले नुकसान आणि त्यातून मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासंदर्भात माराव्या लागलेल्या फेर्‍यामुळे वैतागलेल्या गडमिरे यांना कायद्याचे शिक्षण घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. दोन वेळच्या प्रयत्नानंतर त्यांनी अखेर 73 व्या वर्षी एलएल.बी. पदवी घेतलीच.

गडमिरे यांनी एलएल.बी.चे शिक्षण बार्शी येथील राजश्री शाहू लॉ कॉलेजातून पूर्ण केले. ही पदवी घेण्यासाठी त्यांनी यापूर्वी 1967 लाही प्रवेश घेतलेला होता. पण, तेव्हा त्यांना पदवी मिळवता आली नाही. गडमिरे यांची स्वत:ची नाट्य नटराज ही नाट्यसंस्था आहे. त्यांनी जवळपास 30 वर्षे मागास समाज मंडळाच्या वसंतराव नाईक शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरीही केली.
मानसिक, शारीरिक त्रासही
सध्या गडमिरे यांचे वय 73 वर्षे आहे. त्यांना 30 वर्षांहून अधिक काळापासून मधुमेहाचा त्रास आहे. नुकतीच अँजिओप्लास्टीही झालेली आहे. तरीही परिवहनच्या बसमधून येजा करून त्यांनी ही पदवी मिळवली हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते स्वत: ही गोष्ट अभिमानाने सांगतात.
गरजवंतांचा वकील
समाजात जी अनागोंदी पसरली आहे ती दूर करण्यासाठी तसेच गरजवंतांचा वकील अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी मी वकिली पूर्ण केली आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. शिक्षकांवर होत असलेल्या व झालेल्या अन्यायाचे खटले मोफत लढवण्याची माझी तयारी आहे. मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत शिकत असतो, मानवाने शिकणे सोडू नये.’’
रेवणसिद्ध गडमिरे