सोलापूर - पुण्याहून सोलापूरला निघालेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसचे इंजिन दौंड रेल्वे स्थानकाजवळ अचानक बंद पडले. पुण्याहून दुसरे इंजिन मागवून ही गाडी पुन्हा सोलापूरसाठी मार्गस्थ करण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे रेल्वे विभागात ही घटना घडली.
इंजिन नादुरुस्त झाल्याने गाडीला सोलापूरला येण्यास सुमारे ४० मिनिटांचा उशीर झाला. दुपारी दीड वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचणारी इंद्रायणी एक्स्प्रेस बुधवारी दोन वाजून १० मिनिटांनी पोहोचली. गाडी आल्यानंतर सुमारे ३० मिनिटांचा थांबा घेऊन गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी ही गाडी सोलापूर रेल्वेस्थानकावरून पुण्याकडे मार्गस्थ झाली. यामुळे या गाडीस पुण्याला पोहोचायलाही उशीर झाला.
कुर्डुवाडीत झाली वाहतुकीची कोंडी
कुर्डुवाडीरेल्वे वर्कशॉपमध्ये निघालेले रेल्वे इंजिन बुधवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास रूळावरून खाली घसरले. कुर्डुवाडी-बार्शी रस्त्याच्या मध्यभागी ही घटना घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन इंजिन रूळावर घेण्यासाठी प्रयत्न करीत होते.
मालडबे घेऊन येण्यासाठी हे इंजिन कुर्डुवाडी स्थानकावरून रेल्वे वर्कशॉपकडे निघाले होते. रेल्वे इंजिनचे पुढील बाजूचे दोन चाक रूळावरून खाली घसरले. शहरातून बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी इंजिन घसरल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यावर रूळ घसरले असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मोठ्या जाड लोखंडी पट्ट्या टाकून गाडी रूळावर घेण्याचा प्रयत्न केला. दोन महिन्यांपूर्वी वर्कशॉपमध्ये अशाच प्रकारे रूळावरून गाडीचे चाक घसरले होते. रेल्वे वर्कशॉपमध्ये जाणाऱ्या रेल्वेमार्गाची दुरुस्ती व्हायला हवी.