आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईमुळे कुस्तीसह आखाडेही चीतपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरात कुस्ती परंपरेचा मोठा इतिहास आहे. येथील अनेक मल्लांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मैदाने गाजवली आहे. राज्यातील पहिला तालीम संघ सर्वप्रथम सोलापुरात स्थापन झाला. मात्र, खुराकासाठी लागणारा वाढता खर्च आणि समाजातील दानशूर व्यक्तींना कुस्तीवीरांना दत्तक घेण्याची परंपरा कमी झाल्याने सोलापुरात या पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सोलापुरातील कुस्ती परंपरा

शहरातील अनेक आखाडे आणि तालीम संघाचा दरारा होता.त्यातील काही नावे आजही प्रसिद्ध आहेत.पण,यातील कुस्तीचे नाव कमी झाल्यासारखे वाटत आहे. अनेक मल्ल येथील मातीत तयार झाले. या मातीतीलच रामरहीम म्हणून त्र्यंबक मास्तर व इब्राहिम उस्ताद यांची जोडी सोलापूरकरांच्या परिचयाची होती. महिला पैलवान म्हणून राहिबाई शिंदे या तितक्याच तोडीच्या खेळाडू होत्या. सध्या राणी, अश्विनी, उषा माने, निशिगंधा तरंगे, शोभा भोसले, अनिता गव्हाणे, वैशाली राठोड, काजल जाधव, रार्जशी कांबळे, पूजा ढाणे या महिला खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सोलापूरचा नावलौकिक वाढवत आहेत.

प्रशस्त असा सिद्धेश्वर आखाडा आपल्याकडे आहे. परंतु, पुरातन विभागाचा अडसर येत असल्यामुळे येथे आवश्यक सुविधा करता येत नाहीत. हा खेळ टिकवून ठेवायचा असेल तर राजार्शय आणि लोकार्शयाची गरज आहे. काही साखर कारखाने मल्लांना व तालमींना दत्तक घेतात. सोलापुरात हे चित्र दिसत नाही.

नामवंत तालीम व आखाडे

लाल व भगवा आखाडा, पापय्या, नारायण तालीम (लक्ष्मी चाळ), दत्तात्रय तालीम (सलगर वस्ती), गवळी वस्ती, पत्रा तालीम, र्शद्धानंद, थोरला मंगळवेढा तालीम, गोल, पाणीवेस, साठे तालीम, जय हनुमान तालीम (केगाव), बडी बाणेकरी, सिद्धेश्वर, जाम मिल, पंजाब तालीम, नवी तालीम (लोधी गल्ली), बकर कसब (लष्कर), आप्पा तालीम (कुंभार वेस) यातील बोटावर मोजण्याइतक्याच तालीम सध्या सुरू आहेत.
असे असतात आखाडे

5 बाय 5 मीटर लांबी-रुंदीचा देशी आखाडा
50 सेंटीमीटर जाडीची माती असावी
20 सेंटीमीटरपर्यंत काव, राखीचे मिर्शण
6 बाय 6 मीटरचा विदेशी आखाडा
या आहेत समस्या
खुराक व लाल मातीचा वाढता खर्च
सरावासाठी स्वच्छ विस्तीर्ण मैदानांचा अभाव
या खेळासाठी प्रशिक्षित वस्तादांची कमतरता
कुस्तीसाठी ‘मॅट’ची व्यवस्था आवश्यकता
ग्रामीण खेळाडूंचे कुस्तीविषयीचे तोकडे ज्ञान
कुस्तीहौद्यात हळद, काव, ताक, लिंबू व गोडेतेलाचा अभाव,खर्च परवडत नाही
क्रीडा धोरणात पारंपरिक खेळांना दुय्यम स्थान
कुस्तीतील प्रकार
हनुमंती, भीमसेनी, जांबुवती, जरासंधी, ग्रीको रोमन, फ्री-स्टाइल, वेस्टमूरलंद, कॉर्नवॉल, डेव्हन, आयरीश, स्कॉटीश, जुजुत्सू
महत्त्वाचे डाव
एकेरी पट : एक पाय धरून ओढणे
दुहेरी पट : दोन्ही पाय धरून ओढणे
ढाक : मान बगलेत धरून बाजूला हात धरून पोटाखाली जाऊन पाठीवरून फेकणे
धोबी : एक हात धरून पोटाखाली जाऊन पाठीवरून टाकणे
कलाजंग : पाय किंवा हात पोटाखाली अथवा छातीखाली जाऊन मानेवरून टाकणे
घिस्सा : खाली घेऊन एक हात बाजूला काढून पाठीवर चढवून दुसर्‍या मांडीखाली हात घालून हवेत फेकणे
मोळी : दोन्ही पाय आपल्या बगलेत दाबून त्याला मानेवरून फिरवणे
सोलापूरच्या मातीतील प्रसिद्ध मल्ल
वसंत पैलवान देशपांडे, रेवप्पाणा परळकर, विठोबा दुधाळ, लिंगप्पा जोशी, विठ्ठलराव उत्तरकर, अल्लाउद्दीन पैलवान, अमिनअल्ला पैलवान, गंगाराम परळकर, सीताराम गाडीवान, नाशू पैलवान, गफूर पैलवान, बाबू सुरवसे, जाफर कुरेशी, मुरलीधर घाडगे, शंकरराव ढंगेकर, सदाशिव ताकमोघे, सुभाष वीर, मारुती चौगुले, पांडुरंग चौगुले, रमेश माने, रवींद्र माने, मधुकर इगवे, दादा खांडेकर, गोविंद नाईकवाडी, दत्तात्रय कोलारकर, सुभाष वीर, राजाभाऊ देशपांडे, मारुती सरवदे, नितीन खुर्द, अमोल काशीद, दीपक चौगुले, युवराज सरवदे यांची कुस्तीगिरीतील मुशाफिरी मोठी ठरली.
कुस्तीला राजार्शय हवाच
महागाईमुळे कुस्तीचा खर्च वाढला आहे. पूर्वीसारखी या खेळाला मिळणारी दानशूर व्यक्तींची मदत थांबली आहे. या पारंपरिक खेळाला चालना देण्यासाठी जुनी लक्ष्मी चाळीत र्शीकृष्ण कुस्ती केंद्राची स्थापना केली आहे. शहर जिल्ह्यातील मुलांना येथे प्रशिक्षण दिले जाते. भरत मेकाले, उपमहाराष्ट्र केसरी
आर्थिक पाठबळ महत्त्वाचे
415 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. लाल मातीत घाम गाळल्याशिवाय शरीर बनत नाही. तरुणांना कुस्तीचे आकर्षण आहे, पण आर्थिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे या खेळाला प्रोत्साहन मिळत नाही. महागाईचा फटका बसत आहे. अमर दुधाळ, शहर तालीम संघ, कार्याध्यक्ष
स्पर्धा व्हायला हव्यात
राज्यात तालीम संघाची स्थापना प्रथम सोलापुरात झाली. जगज्जेते गामा व गुंगा या लाहोरच्या पैलवानांना शहरात आणण्यात आले होते. नंतरच्या काळात मात्र कुस्तीकडे दुर्लक्ष झाले. सिद्धेश्वर केसरी, महापौर केसरी स्पर्धा व्हायला हव्यात. तरुणांनी लाल मातीत, मॅट कुस्त्यात उतरावे. राजाभाऊ देशपांडे, ज्येष्ठ वस्ताद
करिअर म्हणून निवडावे
महागाईमुळे कुस्तीचा खेळ परवडत नाही. एका पैलवानाचा खर्च म्हणजे पूर्ण कुटुंबाचा खर्च आहे. नोकरीची शाश्वती नाही. यामुळे यात करिअर करावे, असा कोणी विचार करत नाही. भविष्याचा विचार करता या क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. करिअर म्हणून या खेळाचा विचार व्हावा. संजय मगर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते
2004 पासून प्रस्ताव
सिद्धेश्वर आखाड्याच्या सुधारणेबाबतचा प्रस्ताव 2004 पासून तयार करण्यात आला होता. तो मंजूर होऊनही पुरातत्व खात्यामुळे सुधारणा करण्यास अडचण येत आहे. शिवाय पैलवानांच्या खुराकाचा खर्च परवडणारा नसल्याने अलिकडील कुस्ती पॉईंट व टेक्निक प्रकाराकडे वळत आहे. किरण उत्तरकर, महाराष्ट्र पंच, वस्ताद