आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्याचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पक्षांतर्गत निवडणूक होऊन अजून महिना होत नाही तोवर भारतीय जनता पक्षात अंतर्गत लाथाळ्याचे राजकारण पुन्हा डोके वर काढत आहे. शहराध्यक्षपदी विजय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असताना दुसरीकडे काही जणांनी मुंबई गाठून र्शेष्ठींकडे तक्रारींचा सूर आळवला. त्यातच महापालिकेतील विरोधी पक्षनेते निवडीबाबत निर्णय होत नसल्याने नगरसेवकांतही दोन गट पडले आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिका अंदाजपत्रक सभेत एलबीटीप्रश्‍नी दुटप्पी भूमिका घेतल्याच्या मुद्दय़ावरून भाजपवर टीका होत असताना आता पक्षांतर्गत गटबाजीने अंतर्गत राजकारणात संघर्ष सुरू झाला आहे. महापालिका नगरसेवकांतही धुसफूस सुरू झाली आहे. पूर्व भागातील भाजपचे पाच नगरसेवक आहेत. त्यातील चौघांनी एकत्र येऊन रविवारी स्वतंत्र बैठक घेतली. त्याचीही चर्चा रंगली आहे.


मुंबईत विनोद तावडे यांच्यासमोर मांडले गार्‍हाणे
शहरातील काही पदाधिकार्‍यांनी मुंबई गाठून विधिमंडळातील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे आमदार देशमुख यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या. तावडे यांनीही सुमारे अर्धा ते पाऊण तास या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेळ दिला. पक्षीय काम करत असताना पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन निर्णय होत नाहीत, ते सर्वांना विश्वासात घेऊन व्हावे, ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती नेमावी, अशा मागण्याही या वेळी मांडण्यात आल्या. तावडे यांच्याकडे तक्रारी घेऊन गेलेल्यांमध्ये वीरभद्र बसवंती, राजकुमार काकडे, गुलजार शिवशिंगवाले, जक्कपा कांबळे, अशोक यनगंटी, दत्तात्रय कल्पवृक्ष आदींचा समावेश होता, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे यात काही माजी नगरसेवकही आहेत.


शह-काटशहाचे राजकारण
महापालिका सभागृहात भाजपचे 25 नगरसेवक आहेत. त्यांच्यात सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. त्यातील एका गटाने र्शी. दुस्सा आणि यन्नम यांच्या नावाचा आग्रह धरला आहे, तर दुसर्‍या गटाकडून कुडक्याल, वड्डेपल्ली व दिड्डी यांची नावे पुढे केली आहेत. नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास दुस्सा यांना लॉटरी लागू शकते, तर ज्येष्ठांचा विचार केल्यास यन्नम यांचा विचार व्हावा, असा मतप्रवाह पक्षात आहे. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत काही नगरसेवक , नगरसेविकांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती, त्यांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी विचार केला जाऊ नये असाही सूर आहे. आगामी दोन दिवसात निवड जाहीर होऊ शकते.


नगरसेवकांची बैठक
पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद पद्मशाली समाजास देण्यास भाजप अनुकूल आहे. मात्र, त्याबाबत निर्णय झालेला नाही. इच्छुक असलेल्यांमध्ये कृष्णहरी दुस्सा, र्शीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, पांडुरंग दिड्डी यांचा समावेश आहे. यातील चौघांनी एकत्र येऊन बैठक घेतली. ही बैठक रविवारी गोपनीय ठिकाणी झाल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली.


पक्षसंघटनेबद्दल सांगितले
पक्षसंघटनेच्या सोलापुरातील स्थितीची माहिती विनोद तावडे यांना सांगितली. ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती असावी, निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जावेत.’’ वीरभद्रेश बसवंती, भाजप कार्यकर्ता


..तर पद सोडण्यास तयार
पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून जबाबदारी दिली. शहरध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हतो, तरीही पद दिले. मी पक्षाचे काम पदरमोड करून करतो. माझ्याविरुद्ध कोणी तक्रार केली असेल आणि पक्षाने मला आदेश दिले तर त्या क्षणी मी पद सोडेन. तक्रार करणार्‍यांनी पक्षासाठी काय काम केले ते पाहावे. त्यांनी सभासद केले नाहीत आणि ते सक्रिय नाहीत. निवडणुका आले की तक्रारींचा सूर निघतो.’’ आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष, भाजप