आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internal Grouping Issue At Sollapur Congress, News In Marathi

‘सोलापुरी राणें’मुळे वाढल्या काँग्रेस पक्षासमोरील कटकटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुण्यातील मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘स्वबळावर’ लढण्याची तयार दाखवणारी गर्जना केली खरी. पण दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर काँग्रेसच्याच बंडखोरांनी मोठी आव्हाने निर्माण केली आहेत. ‘सोलापुरी राणें’ना शांत करण्याचे जोरदार प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. बंडखोरांना कसे हाताळले जाईल, त्यावरच सोलापुरातील काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील भवितव्य अवलंबून असेल. येत्या काळातील घडामोडी महत्त्वाच्या ठरतील.

माजी महापौर महेश कोठे आणि नलिनी चंदेले हे दोघेही शहरात विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार करून तयारीला लागले आहेत. कोठे यांनी तर आता स्वत:च्या इंग्रजी शाळा, विडी घरकुलमधील आश्रम आदींच्या कामांच्या व्हिडिओ क्लीप तयार करून सुरुवातही केली आहे. त्यावर पक्षाचा कसलाही उल्लेख नाही. कोठेंची तयारी शहर उत्तर की मध्य याचा संभ्रम कायम आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली तर ते उत्तरमध्ये असतील नाही तर अन्य पक्षांकडून मध्यमधून रिंगणात उतरतील असे त्यांचे सर्मथक सांगत आहेत. नलिनी चंदेले या शहर मध्यमधून उमेदवारी मिळावी म्हणून लॉबिंग करत आहेत. बंडखोरीची भाषाही त्यांनी वापरली आहे. त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आल्याच्या बातम्याही पसरल्या आहेत.
राणे यांचेबंड फिके पडल्याने कोठे व चंदेले हे दोघे संभ्रमात दिसत आहे. एका उद्योगपतींच्या मध्यस्थीने दुसरे बंड शांत झाल्याचे सांगितले जाते. कोठे हे शिंदे यांच्या विश्वासातीलच मानले जातात, त्यामुळे त्यांच्या बंडाची चर्चा अधिकच रंगली आहे.
रूपनवर गायबच
विधानपरिषदेवर आमदारकीची संधी मिळावी म्हणून अनेकांचे प्रयत्न होते. त्या सर्वांना डावलून माळशिरस तालुक्यातील रामहरी रूपनवर यांना आमदारकी बहाल केली गेली. त्या रूपनवरांचे सोलापुरात दश्रनही झाले नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या निवडीचे पक्षातून थंडे स्वागत झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रूपनवर यांचा रोल काय असेल, हे त्यांना आमदारकी देणार्‍यांनीच ठरवावे, अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांमधून उमटू लागल्या आहेत.

दक्षिणमध्ये दिलीप माने यांना आव्हान
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद जाताच बाळासाहेब शेळके व राजशेखर शिवदारे सर्मथकांनी पक्षश्रेष्ठींसमोर दक्षिण सोलापूरमधून उमेदवारीची उघडपणे मागणी केली. दिलीप माने विद्यमान आमदार असल्याने त्यांचे तिकीट जवळपास निश्चित आहे. असे असतानाही झालेले हे बंड शमवण्याचे प्रयत्नही आता सुरू झाले आहेत. शेळके यांची प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी वर्णी लावून त्याची सुरुवात झाल्याचे चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये माने यांच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली आहे.

ताकदीचे उमेदवार नाहीत
जिल्ह्यात काँग्रेसने स्वबळावर लढायचे ठरले तरी जेथे ताकद होती त्या सांगोला, बाश्री तालुक्यातील नेते महायुतीत जाऊन स्थानापन्न झाले आहेत. करमाळा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर हे मतदार संघ सोडले तर अन्य ठिकाणी काँग्रेसला ताकदीचे उमेदवार मिळणेही कठीण आहे. पंढरपुरातून भारत भालके घड्याळ हातात घेतात की हात झटकतात हे अजून निश्चित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची गर्जना जिल्ह्यात अमलात येणे कठीण आहे.

सोमवारपर्यंत होणार खलबते
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आटोपून गुरुवारी रात्रीच सोलापुरात दाखल झाले आहेत. सोमवारपर्यंत ते सोलापुरात तळ ठोकून आहेत. बंड मोडून काढण्यासाठी ते काय करतील यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.