आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराध्यक्षपद रिक्ततेपूर्वी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपशहराध्यक्ष आमदार विजय देशमुख यांची राज्य मंत्रिपदी वर्णी लागल्याने ते शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. गोपनीय मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. यासाठी प्रा. अशोक निंबर्गी, विक्रम देशमुख, सुरेश पाटील यांच्यासह अन्य नावाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या गटातील व्यक्तीची निवड व्हावी यासाठी नामदार देशमुख प्रयत्नशील असतील. शहराच्या राजकारणात प्रवेश केलेले सुभाष देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत आ. देशमुख यांच्या विरोधात नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, वीरभद्र बसवंतीसह आठ नगरसेवकांनी खुलेपणाने बंड पुकारत शहर उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणी या बंडोबांना थंड करण्यास आमदार देशमुखांना यश आले. त्यासाठी त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असे सांगण्यात आले. निवडणुका झाल्या. आमदार देशमुख ६८ हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळावे म्हणून बंड करणारे नगरसेवकांनी मुंबईत भाजप नेत्याकडे साकडे घातले होते.
राज्यमंत्री झाल्याने विजय देशमुख शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या पदासाठी गोपनीय माेर्चेबांधणी करण्यात येत आहे. विक्रम देशमुख यांचे प्रदेश पातळीवरील नेत्याशी संपर्क असल्याने त्यांच्याबाबत विचार होऊ शकतो. प्रा. अशोक निंबर्गी हे आमदार देशमुखांचे विश्वासू मानले जातात. पक्षातील अंतर्गत हेवेदावे त्यांना माहीत आहेत. नगरसेवक सुरेश पाटील हे आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. आगामी मनपा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी ते दावेदार आहेत. नगरसेवक जगदीश पाटील यांचे नगरसेवक पद धोक्यात आल्यानंतर शहराध्यक्ष पद मिळावे यासाठी तेही प्रयत्नशील आहेत. याशिवाय अनेकजण इच्छुक आहेत.
नगरसेवकांचे बंड
मनपात विरोधी पक्षनेता नेमणूक होण्यास अडचणी येत आहेत. येथे सध्या प्रभारी विरोधी पक्षनेता आहे. नगरसेवक कृष्णहरी दुस्सा यांनी प्रकृतीमुळे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. नवीन नियुक्ती अद्याप झाली नाही. याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट होत नाही.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने भाजपचे महत्त्व वाढले. आगामी मनपा निवडणुकीत युतीची सत्ता येण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची संख्या वाढतोय.