सोलापूर- मंगळयान मोहिमेने जगात भारताची मान ताठ झाली आहे.
आपल्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 64 नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. यानावर ऑनबोर्ड कॉम्प्युटर लावण्यात आला. यामुळे पृथ्वीवरून मंगळ कक्षेपर्यंत संदेशवहनासाठी लागणारा वेळ कमी करता आला. अन्यथा पृथ्वी मंगळ दरम्यान संदेश वहनासाठी तब्बल 12मिनिटांचा अवधी लागला असता. इतक्या अवधीत काहीही घडू शकले असते, अशी माहिती इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष अवकाश संशोधक सुरेश नाईक यांनी दिली. यावेळी नाईक यांनी मंगळ यान मोहिमेतील अनेक अप्रकाशित पैलूंची सफर घडवून आणली. श्री छत्रपती रंगभवन सभागृहात मराठी विज्ञान परिषदेने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रारंभी कै. प्रा. डॉ. नागेश धायगुडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पी. के. जोशी, राजा ढेपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जगात झालेल्या मंगळ यान अभियानांपैकी सर्वात कमी खर्चात झालेली मोहीम म्हणून भारताच्या मोहिमेची नोंद झाली. मंगळ ग्रहावर अगदी पृथ्वीसारखे चित्र आहे. रंगीबेरंगी खडक, विवरे, नदीचे पात्र, बर्फाचे डोंगर आदींचा समावेश. 450 कोटींत 150 कोटी उपग्रहावर,110 कोटी अग्निबाणावर तर 190 कोटी रुपये भूकेंद्रावर खर्च केले. यानाने तब्बल 68 कोटी किलोमीटरचा प्रवास केला. त्याची वेगमर्यादा ८२ हजार किलोमीटर प्रति तास होती. अवकाशातील विविध ग्रहांची स्थिती कशी आहे, यानावर कोणता धूमकेतू तर आदळणार नाही, याआधी इतरांनी सोडलेल्या अवकाशयानांचे अवशेष आपल्या यानावर पडणार नाहीत, हवामान वातावरण कसे आहे याची माहिती घेण्यासाठी भारत सरकारने पॅसिफिक महासागरात नालंदा आणि यमुना या दोन महाकाय बोटींवर ट्रॅिकंग करणारी दोन भूकेंद्रे वसवली होती. यामुळे आवश्यक ती सर्व माहिती संशोधन शाळेत येण्यास खूप मदत झाली. मराठी विज्ञान परिषद आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना सुरेश नाईक. समोर व्याख्यानास उपस्थित श्रोते.