आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबक सिंचन घोटाळ्यातील 4,600 फायली जळाल्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज/पंढरपूर/सोलापूर - माळशिरस तालुक्यात ठिबक सिंचन योजनेतील सुमारे 15 कोटींचा भ्रष्टाचाराचा पुरावा असलेल्या सुमारे 4 हजार 600 फायली आगीत जळाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या फायली जाणीवपूर्वक जाळल्या असाव्यात असा संशय आहे. जळिताचे हे प्रकरण संशयास्पद असल्याचे कृषी खात्याचे अधिकारीही बोलत आहेत.

रविवारी (दि.22) सायंकाळी सहा वाजता पंढरपूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या गोडावूनमधील सन 2011-12 मधील प्रस्तावांच्या सुमारे 4 हजार फायली आगीत जळाल्या आहेत. माळीनगर येथील कृषिभूषण सुरेश वाघधरे यांनी भ्रष्टाचाराचे हे प्रकरण उघडकीस आणले. यातून कृषी खात्याचे सहा अधिकारी निलंबित झाले. 14 वितरकांचे परवाने रद्द करून आठ वितरकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी खाते हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करत असताना वाघधरे यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली. 4 डिसेंबर रोजी लोकायुक्त पी. बी. गायकवाड यांच्या समोर सुनावणी झाली होती. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील भ्रष्टाचारप्रकरणी गत पाच वर्षांतील 16 हजार 200 फायली सुरक्षित ठेवण्यात याव्यात, असे आदेश लोकायुक्तांनी कृषी खात्याचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांना दिले होते. परंतु लोकायुक्तांच्या या आदेशाला कृषी खात्याने केराची टोपली दाखवल्याचे या फाइल जळीत प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.

फायली घेण्याबाबत दिली होती पूर्वकल्पना
राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानातील 4548 प्रस्ताव पंढरपूर उपविभागीय कृषी अधिकार्‍यांकडून परत घ्याव्यात, अशी लेखी मागणी कृषिभूषण सुरेश वाघधरे यांनी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे 17 जून 2013 रोजी केली होती. फायली ताब्यात घेण्याबाबत सहा महिन्यांपूर्वीच कल्पना दिली होती. त्याचवेळी फायली ताब्यात घेतल्या असत्या तर गैरप्रकारातील दोषी सापडले असते. पण, कृषी आयुक्तांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

घटना संशयास्पद
ही घटना संशयास्पद असून, आम्ही वरिष्ठांना क ळवले आहे. पंढरपुर तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.- अविनाश मोरे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर

चौकशीवर परिणाम नाही
पंढरपुरात काही फायली जळाल्या असल्या तरी त्यातील माहिती इतर तीन ठिकाणी ठेवलेली असते. शिवाय संगणकावरही माहिती संग्रहित असते. त्यामुळे चौकशीवर परिणाम होणार नाही.- एस. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे

दडपण्यासाठी जाळल्या फायली
लोकायुक्तांच्या आदेशानंतर या फायली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कृषी खात्याच्या वरिष्ठांची होती. हे प्रकरण दडपण्यासाठीच फायली जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोषी अधिकारी कसे सापडणार? या जळीतकांडामागे कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी असावेत. - कृषिभूषण सुरेश वाघधरे, माळीनगर

अहवाल आला, तपास सुरू
फायली जळाल्याचा अहवाल पोलिसांकडे आला आहे. पंढरपूरच्या पोलिस उपअधीक्षकांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. - राजेश प्रधान, पोलिस अधीक्षक

नवे रेकॉर्ड तयार करण्याचे आव्हान
घटनेची माहिती तातडीने कृषी आयुक्तांना दिली आहे. कृषी अधिकार्‍यांमार्फत घटनेची माहिती आम्ही घेत असून जळीत प्रकरणामुळे गांभीर्य वाढले आहे. ठिबक सिंचन गैरप्रकारातील काही फाइल जिल्हास्तरावर असून त्याद्वारे नवीन फायली तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरूआहे. या गैरप्रकारप्रकरणी कृषी विभागातील काही अधिकारी निलंबित झाले आहेत. बहुतांश फायली जळून खाक झाल्याने नवीन रेकॉर्ड तयार करण्याचे आव्हान आहे. - रफिक नाईकवाडी, कृषी अधीक्षक, सोलापूर

तिघांचे जबाब घेतले
आतापर्यंत स्वप्नील नांगे (शिपाई), रवींद्र बाजीराव कुलकर्णी (कृषी साहाय्यक) आणि अवधुत मधुकर मुळे (मंडल कृषी अधिकारी) यांचे जबाब घेतले आहेत. अजून कुणावरही कारवाई केलेली नाही. - बाळासाहेब पानसरे, हवालदार, पंढरपूर तालुका पोलिस ठाणे