आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी कंपन्यांची पाठ, तरुणाई पुण्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुंबई, पुणे, नाशिकनंतर उद्योग केंद्र म्हणून सोलापूरकडे पाहिले गेले. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चिंचोळी एमआयडीसीत टोलेजंग माहिती तंत्रज्ञान संकुल (आयटी पार्क) उभे केले. त्याचे शानदार उद्घाटन 10 फेब्रुवारी 2001 रोजी तेव्हाचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते केले. परंतु हायस्पीड इंटरनेट आणि इतर पायाभूत सुविधा नसल्याने आयटी कंपन्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ही इमारत इटलीच्या करेरा होल्डिंग्जला देण्यात आली. त्याचे उद्घाटन 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना केले. पण या कंपनीने येथील उद्योजकांनाच चुना लावण्याचे उद्योग करून पळ काढला. त्यानंतर ही इमारत ‘नीटवेअर’ उत्पादनासाठी वापरात आणण्याचे प्रयत्न झाले. पुन्हा उद्घाटन आणि त्यानंतर ओसाड अशी या इमारतीची शोकांतिका आहे.
दुसरीकडे आयटी क्षेत्रातील सोलापूरच्या तरुणाईची पुण्याची ओढ थोपवणे कठीण झाले आहे. कारण सोलापुरात संधीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरातील घरटी एक माणूस आज पुण्यात असल्याचे चित्र आहे. त्याचा ताण रेल्वेवर पडला. रेल्वेसेवाही तोकडी पडली. इंटरसिटी, इंद्रायणीत घुसण्याच्या स्पर्धेत चेंगराचेंगरी होऊ लागली. त्यापुढे रेल्वे प्रशासनही हतबल झाले. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापुरात आयटी पार्क गरजेचे असून, किमान तीन कंपन्या आल्या तरच येथील युवक स्थिरावेल. औद्योगिक वाढ होईल. देशाच्या नकाशावरील सोलापूरचे चित्र किमान टिकून राहील, असे येथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने आता प्रयत्न आवश्यक आहे. केंद्रात सत्तांतर झाले. नवे खासदार लाभले. त्यांच्या प्रयत्नांतून तरी सोलापूरला आयटी कंपन्या येतील, अशी आशा सोलापूरकर बाळगून आहेत.